मुंबई : भांडुप येथे एका शाळेमध्ये शिकत असलेल्या सोळा वर्षाच्या विद्यार्थिनीवर त्यातच शाळेतील मुख्याध्यापकाने त्यांच्या साथीदाराच्या मदतीने अॅसिड हल्ला केला. या घटनेने शाळेत ही घटना घडल्याने पालकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
या हल्ल्यात पीडित विद्यार्थिनीला छाती आणि मांडीवर जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी मुख्याध्यापक आणि अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि.२३) रोजी हा संतापजनक प्रकार घडला. पीडिता सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना हा प्रकार घडला.
त्यावेळी तिच्या शाळेचा मुख्याध्यापक, एक शिक्षक आणि शाळेतील दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिला अडवले व तिच्यावर मुख्याध्यापकाने ॲसिड फेकले. पीडितेच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित शाळेचा मुख्याध्यापक आणि त्याच्या तीन साथिदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
पीडितेने आपल्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल आपल्या वडिलांना फोनवरून माहिती दिल्यानंतर तिचे वडील तातडीने घटनास्थळी धावत आले. पीडितेला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे, असेही पोलिसांनी सांगितले.