बिहार, 12 जून 2022: बिहारमध्ये सध्या राजकीय चर्चांचा बाजार तापला आहे. नितीशकुमार हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. नितीश कुमार यांच्या जवळचे मानले जाणारे श्रवण कुमार यांनी नितीश कुमार सक्षम असून त्यांच्यात राष्ट्रपती होण्यासाठी सर्व गुण आहेत, असं वक्तव्य प्रसारमाध्यमांना केल्याने त्याची चर्चा अधिक तीव्र झाली. त्यांना संधी मिळाली तर का नाही? या विधानावरून चर्चेचा बाजार तापला होता, तोपर्यंत या सर्व अटकळांना पूर्णविराम देण्याचे काम लालन सिंह यांनी केलंय.
लालन सिंग यांचं वक्तव्य
मुंगेर दौऱ्यात लालनसिंग लखीसराय येथे पोहोचले असता पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, राष्ट्रपती निवडणुकीची अटकळ पूर्णपणे चुकीची आहे, मुख्यमंत्री नितीश कुमार बिहारच्या जनतेची सेवा करत आहेत आणि त्यांच्याबद्दल ज्या अफवा पसरविल्या जात आहेत ते योग्य नाही. नितीश कुमार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार नाहीत आणि राष्ट्रपती होणार नाहीत. साहजिकच जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी या विधानाने त्या सर्व अटकळांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय.
नितीश यांनी व्यक्त केली होती राज्यसभेवर जाण्याची इच्छा
याआधी नितीश कुमार यांनीच त्यांच्या चेंबरमध्ये औपचारिक वार्तालाप करताना या गोष्टीला हवा दिली होती की, त्यांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा उरली आहे. मात्र, नंतर त्यांनीच याचा इन्कार केला. त्यानंतरही ते राज्यसभेवर जाऊन उपराष्ट्रपती होणार असल्याची चर्चा जोरात होती. बिहारचे नेतृत्व दुसऱ्याच्या हाती सोपवून नितीशकुमारांना दिल्लीत बोलावण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलं.
त्यानंतर चाललेली ही चर्चा थांबली. राष्ट्रपती निवडीबाबत पुन्हा एकदा नितीश कुमार यांचे नाव पुढं आलंय. ज्याला उत्तर देताना जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी नितीश कुमार बिहारची सेवा करणार असून ते बिहार सोडून कुठेही जात नसल्याचं स्पष्ट केलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे