इंदापूर तालुक्यातील बीकेबीएन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी- हर्षवर्धन पाटील

इंदापूर, ४ नोव्हेंबर २०२०: तालुक्यातील बीकेबीएन रस्त्याची बावडा ते तावशी दरम्यान खडी उचकटून व खड्डे पडून अतिशय दुर्दशा झाली आहे. त्यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून रस्ता वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवून बुधवारी (दि.4) केली आहे.

बारामती-कळब- बावडा- नरसिंहपूर हा रस्ता बीकेबीएन म्हणून ओळखला जातो. या रस्त्याची हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी (दि.3) लाखेवाडी येथे पाहणी केली. सध्या रस्ता अतिशय खराब झाल्याने एसटी महामंडळाने एस.टी. सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून रस्ता वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी या पत्रात हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.

बावडा ते तावशी दरम्यान असलेल्या लाखेवाडी-रेडणी- निरवांगी- निमसाखर- कळंब- चिखली- कुरवली-जांब- उद्धट या गावांमधील नागरिकांना हा रस्ता वाहतूकीस धोकादायक झाल्याने चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या या परिसरात अनेक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम चालू आहे. अहोरात्र रस्त्यावरून ऊसाची वाहतूक करणे अवघड झाले आहे. चिखली ओढा येथे थोडा झाला तरी पूर येऊन रस्त्यावरील वाहतूक पाण्यामुळे बंद पडले. सध्या याठिकाणी अतिवृष्टीमुळे पडलेले भगदाड तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे. चिखलीच्या पुढे बारामती तालुक्यात सोनगाव पासून बीकेबीएन रस्त्याचे काम करण्यात आल्याने रस्ता चांगला असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.

हर्षवर्धन पाटील यांनी पुणे येथील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेशी दूरध्वनीवरून चर्चा करून रस्ता दुरुस्तीस त्वरित सुरुवात करावी अशी सूचना केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा