वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर…

मुंबई, १४ नोव्हेंबर २०२०: वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे. वीज कर्मचाऱ्यांचा संप होणार नसल्यानं दिवाळीत नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचंही डॉ. नितीन राऊत यांनी सांगितलं. उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. लॉकडाउन काळात वीज पुरवठा करण्यात, निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झालेली वीज यंत्रणा उभारण्यात, ठप्प झालेला मुंबईचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात उर्जा विभागाने मोठी भूमिका बजावली. हीच बाब लक्षात घेऊन उर्जा विभागाच्या कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोनसची दिवाळी भेट जाहीर केली असल्याचं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

बोनसची रक्कम ही गेल्यावर्षी इतकीच असणार आहे, गेल्या वर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांना १५ हजार, विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक ९ हजार बोनसची रक्कम मिळाली होती. विशेष बाब म्हणजे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महावितरणामध्ये भरतीसाठी पात्र ठरलेल्या ३६८ अभियंत्यांच्या नियुक्तीचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे वर्षभरापासून नियुक्तीची वाट पाहणाऱ्या ३६८ जणांची दिवाळीही गोड झाली आहे.

महावितरण कंपनीत गेल्या वर्षी भरती करण्याच्या दृष्टीने कनिष्ठ अभियंता या पदाकरिता निवड परीक्षा घेण्यात आली होती. या नंतर परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवड यादी करून सुमारे ३६८ पात्र उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले नव्हते. आता या सर्व पात्र उमेदवारांना नियुक्ती आणि पदस्थापना देण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऊर्जा सचिव व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांना आज दिले. या आदेशामुळे सर्व नवनियुक्त अभियंत्यांची दिवाळी गोड होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा