आज देखील मंत्रिमंडळाची बैठक रद्द, शेतकऱ्यांसाठी मदत लांबणीवर

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२०: परतीच्या पावसामुळे यंदा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शरद पवार या नेत्यांनी विदर्भ, मराठवाडा या भागांमध्ये आढावा घेण्यासाठी भेट देखील दिली. यानंतर शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. ही बैठक काल म्हणजेच गुरुवारी होणार होती मात्र ते काही कारणास्तव रद्द झाली. आज देखील ही मंत्रिमंडळ बैठक रद्द झाली आहे. अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याकारणाने ही बैठक रद्द करण्यात आली आहे.

सलग दोन दिवस ही मंत्रिमंडळाची बैठक रद्द होत असल्याकारणाने राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी अजून किती वाट पाहावी लागणार? असा प्रश्न विरोधकांसह शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. सलग दोन दिवस ही बैठक रद्द होत आहे. अशास्थितीत अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता मदतीसाठी आठवडाभर वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना ताप आल्यानं ते होम क्वारंटाईन झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार उपस्थित राहू शकत नसल्यामुळं ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, अजित पवार हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित राहू शकतात अशी चर्चा काल सुरु होती. पण आता ही बैठकच आठवडाभरासाठी रद्द करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा