लालू प्रसाद यादव यांच्या जामिनाविरोधात CBIची सुप्रीम कोर्टात धाव, २५ ऑगस्टला सुनावणी

नवी दिल्ली, १८ ऑगस्ट २०२३ : चारा घोटाळा प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या जामिनाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. झारखंड उच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांच्या जामिनाला आव्हान देणारी केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या याचिकेवरील सुनावणी ही २५ ऑगस्टला सुचीबद्ध करण्यास न्यायालयाने सहमती दर्शवली.

सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड, न्या.संजय कोरल आणि न्या.मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस व्ही राजू यांनी याचिका तत्काळ सुचीबद्ध करण्याची विनंती आज केली आहे.

झारखंड उच्च न्यायालयाने १७ एप्रिल २०२१ रोजी दुमका कोषागारातून ३.१३ कोटी रुपयांच्या अपहारसंबंधी लालू प्रसाद यांना जामीन दिला होता. त्यांनी अर्धा तुरुंगावास कापला असल्याचे न्यायालयाने त्यावेळी स्पष्ट केले होते. लालू प्रसाद यांना झारखंड मधील देवधर, दुमका आणि चाईबासा कोषागारातून फसवणूक करीत पैसे काढण्यासंबंधीत चारा घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा