घोरपड हा सरड्यासारखा दिसणारा पण त्याच्यापेक्षा बराच मोठा सरीसृप प्राणी आहे. घोरपडींचा अधिवास इराण, अफगाणिस्तान, भारत, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार येथील नद्यांच्या खोऱ्यांत तसेच उष्ण हवामान असलेल्या दक्षिण आशिया, आफ्रिका, मलेशिया, ऑस्ट्रेलिया इ. देशांत पण आहे. त्या सामान्यतः नद्या, ओढे यांच्या काठच्या ओलाव्याच्या ठिकाणी राहतात. त्यांना अनुकूल वातावरण विविध भागात असल्याने त्यांचे अस्तित्व दूरवर पसरलेले आहे. घोरपडीच्या जगभरात तीसेक जाती असून त्यांतील चार भारतात आढळतात.
घोरपड हा सरीसृप वर्गातील स्क्वॅमॅटा (Squamata) गणातील व्हॅरॅनिडी (Varanidae) कुलातील प्राणी असून याचे शास्त्रीय नाव व्हॅरॅनस बेंगालेन्सिस (Varanus bengalensis) आहे. यास बेंगाल मॉनिटर (Bengal monitor) किंवा कॉमन इंडियन मॉनिटर (Common Indian monitor) असेही म्हणतात. व्हॅरॅनस मॉनिटर ही भारतात जवळजवळ सगळीकडे आढळणारी जाती आहे. व्हॅ. बेंगॉलेन्सिस ही जाती बंगालमध्ये आढळते. व्हॅ. सॉल्व्हेटॉर ही जाती हिमालयात १,८०० मी. उंचीवर आणि गारो टेकड्यांतील नद्यांतही आढळते. ही पाण्यात राहणारी आहे. व्हॅ. फ्लॅव्हिसेन्स ही पिवळसर घोरपड पंजाब व पश्चिम बंगालमध्ये आढळते.
घोरपडीच्या शरीराच्या वरच्या बाजूचा रंग तपकिरी राखाडी किंवा तपकिरी पिवळसर असून त्यात काळे ठिपके किंवा लहान लहान पट्टे असतात खालच्या बाजूचा रंग पांढरट पिवळा असतो. वरची त्वचा जाड, खरखरीत असून तिच्यावर लहान गोलसर खवले असतात खालची त्वचा काहीशी गुळगुळीत आणि जाड असून तिच्यावर मोठे चौकोनी खवले असतात व हनुवटीची त्वचा पातळ, मऊ लोंबती असते. शरीर जाडजूड व भक्कम असते. भारतीय घोरपडीच्या धडाची डोक्यासकट लांबी तीन फुटापर्यंत असून शेपटीही तेवढीच असते. नर मादीपेक्षा मोठा व शक्तिमान असतो. डोके लांब मानेने धडाला जोडलेले असते तोंड निमुळते असून त्याच्या टोकाला तिरकस नाकपुड्या असतात डोळे थोडे बाजूला असून त्यांना पापण्या नसतात पायांवरील बोटे लांबट आणि मोठी असून त्यांच्या टोकांवर मोठ्या मजबूत नख्या असतात. शेपूट लांब, जाड व चपटे असते. स्वसंरक्षणाच्या वेळी घोरपड शेपटाचे जोरात तडाखे देऊ शकते. त्याचप्रमाणे पोहताना ती शेपटाचा उपयोग वल्ह्यासारखा करते.
घोरपड पानगळ, अर्धपानगळ, सदाहरित उष्णकटिबंधीय जंगले,शेती व काटेरी वने अशा ठिकाणी राहणे पसंत करते. ती शेतभागात अधिक प्रमाणात आढळताना दिसते. मराठीमध्ये घोरपड या प्राण्यास नेहमी स्त्रीलिंगी रूप वापरतात. घोरपड आपल्या बळकट नख्यांनी खडकाला घट्ट धरून जागच्या जागी चिकटून राहू शकते म्हणून पूर्वी घोरपडीच्या कमरेस दोर बांधून डोंगरकडा किंवा किल्ला चढून जाण्यास तिचा उपयोग करीत असत असे म्हणतात. तानाजी मालुसरे आपल्या यशवंती नावाच्या घोरपडीच्या साहाय्याने कोंडाणा (सिंहगड) किल्ला चढून गेल्याची ऐतिहासिक कथा प्रसिद्ध आहे.
घोरपड चपळ असून प्रसंगी त्या जोराने धावू शकतात. धावताना शेपटी वर उचलतात. मोठ्या घोरपडी संकटकाळी लपण्यासाठी झाडे-झुडूपांचा उपयोग करतात. संकटात सापडल्यास ती अंग फुगविते, जोराने फुस्कारते व शेपटीने जोरात तडाखे देते. लहान घोरपडी संकटकाळी झाडांवर चढतात. घोरपड स्वभावाने भित्री असून ती माणसांवर हल्ला करत नाही. परंतु, तिला पकडल्यास क्वचितप्रसंगी ती चावते. तिचा चावा फारच जोराचा असून पकडही सहज न सुटणारी असते. दूरवरचे पाहण्यासाठी किंवा दुसऱ्या नराबरोबर लढण्यासाठी घोरपडी आपल्या मागील दोन पायांवर उभ्या राहतात. त्या उत्तम पोहू शकतात. पोहताना त्या शेपटाचा उपयोग वल्ह्यासारखा करतात. घोरपड पाण्याखाली १७ मिनिटे राहिल्याची नोंद आहे. घोरपड दिनचर असून ती सकाळी सक्रिय होऊन ऊन खायला बाहेर पडते. परंतु, मोठ्या घोरपडी प्रसंगी रात्री वस्तीस असलेल्या वटवाघूळांची झाडावर चढून शिकार करतात. थंड प्रदेशांत आढळणाऱ्या घोरपडी हिवाळ्यात कमी तापमानामुळे बिळामध्ये आश्रय घेतात. घोरपड ऋतुमान आणि भक्ष्यांच्या उपलब्धतेनुसार क्षेत्र (Territory) बदलत असते. घोरपडीची दृष्टी तीक्ष्ण असल्याने २५० मीटर दूर असलेल्या माणसांची चाहूल त्यांना लगेच लागते.
घोरपडीच्या आहारामध्ये विविधता असून अपृष्ठवंशीय तसेच पृष्ठवंशीय प्राणी त्यांचे भक्ष्य असतात. अपृष्ठवंशीय भक्ष्यांत जास्त करून कीटक,अळ्या, विंचू, खेकडे, गोड्या पाण्यातील झिंगे, गोगलगायी, वाळवी, मुंग्या इत्यादींचा समावेश होतो. याशिवाय मोठ्या आकाराच्या पृष्ठवंशीय भक्ष्यांत बेडूक व त्यांची अंडी तसेच मासे, सरडे, साप, उंदीर, खारी, चिचुंद्री आणि पक्षी आदींचा समावेश होतो. तसेच त्या प्रसंगी ससे आणि घुशी यांची बिळातून खणून काढून शिकार करतात. ऋतुमानानुसार आणि आजूबाजूच्या परिसराप्रमाणे त्यांच्या आहारात बदल होतो. उन्हाळ्यात घोरपड पाण्यातील मासे व कीटक तसेच मेलेली जनावरेही खातात. गाय,बैल,हरणासारखे मोठे जनावर मेलेले दिसले तर अनेक घोरपडी एकत्र येऊन ते खातात. त्याचप्रमाणे त्या गुरे ज्या ठिकाणी असतात तेथील शेणामधील कीडे आणि अळ्या देखील खातात.
घोरपडीच्या प्रजननाचा मुख्य काळ जून ते सप्टेंबर असतो. माद्या सपाट अथवा उतारावर बिळांमध्ये किंवा खड्ड्यांमध्ये अंडी घालतात. त्यानंतर त्या ते बीळ माती व पालापाचोळ्यांनी भरून त्यावर आपल्या तोंडाच्या पुढे आलेल्या भागाने माती थापतात. आपल्या घरट्यापासून भक्षकाला दूर ठेवण्यासाठी माद्या बऱ्याच वेळेला आपल्या घरट्याच्या आजूबाजूला अनेक बिळे करतात किंवा खड्डे खणतात आणि माती सर्वत्र पसरून ठेवतात. काही वेळेला घोरपड वाळवीच्या वापरात नसलेल्या वारूळामध्ये बीळ खणते. घोरपड एका वेळेला २० अंडी घालते. बिळातील उष्णतामानाने ती आपोआप उबतात. त्यातून बाहेर पडलेली पिल्ले, किडे मुंग्या छोटी गांडूळे खाऊन स्वबळावरच मोठी होतात.
बंदिवासात असलेली घोरपड साधारणत: २२ वर्षे जगलेल्याची नोंद आहे. खाण्यासाठी व तथाकथित औषधे बनविण्यासाठी घोरपडीची शिकार होत असल्याने त्यांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत घोरपडीस परिशिष्ट १ मध्ये सूचीबद्ध केले असून त्यांची कोणत्याही कारणास्तव शिकार करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. घोरपडीच्या कमी होणाऱ्या संख्येमुळे ही जाती संकटग्रस्त जाती म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे घोरपडीची शिकार थांबवली तर तिचा उपयोग शेतीसाठी होऊ शकेल. मनुष्यास घोरपड धोकादायक नाही. घोरपडीमुळे उंदीर व सापांचा बंदोबस्त होतो. त्यामुळे घोरपडीचे परिसरात असलेले अस्तित्व हे संतुलित परिसंस्थेचे (Ecosystem) लक्षण मानले जाते.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.