आरोग्यत्सोवाद्वारे मंडळांना झाडांसाठी कंपोस्ट खतरुपी प्रसादाचे वाटप

पुणे, २५ डिसेंबर २०२०: आपले पुर्वज १०० वर्षे जगायचे, एवढा त्यांची प्रकृती चांगली असायची. निसर्गाशी पुर्वजांचं तेवढं नातं घट्ट असायचं. आज आपल्या पिढीने पर्यावरणाची वाट लावली, सामाजिक जीवनाची आपण वाट लावली. त्यामुळं युवकांनी कोणतीही कृती करताना आपल्या परिवाराचा, समाजाचा आणि पुढच्या पिढीचा विचार करुन कार्य करावे असे आवाहन माजी पोलीस उपायुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले.

जागतिक किसान दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली माय अर्थ फांउडेशन आणि पतित पावन संघटना कसबा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अनोखा उपक्रम ‘आरोग्यउत्सव’ राबविण्यात आला. यावेळी बर्गे यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

गणेशोत्सव ते नवरात्रोत्सव काळात मंडळे आणि सोसायट्यांनी गोळा केलेल्या निर्माल्यापासून कंपोस्टखताची निर्मिती करण्यात आली होती. ते झाडांना प्रसाद म्हणून २०० गणेशोत्सव मंडळांना वाटप करण्यात आले. माजी पोलीस उपायुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या हस्ते या कंपोस्ट खतरुपी झाडांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे पुणे मनपाचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, कचरा व्यवस्थापनतज्ञ ललित राठी, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, नगरसेवक योगेशजी समेळ, उपस्थित होते
या उपक्रमाचे आयोजन माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, पतित पावन संघटनेचे योगेश वाडेकर, यादव पुजारी, विजय जोरी यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा