ईडीची नॉनस्टॉप छापेमारी, राजारामबापू कोऑपरेटिव्ह बँकेसह पश्चिम महाराष्ट्रात १४ ठिकाणी छापे

सांगली २४ जून २०२३: अंमलबजावणी संचालनालयाच्या(ईडी) पथकाने पश्चिम महाराष्ट्रात १४ ठिकाणी छापे टाकले असुन यापैकी एक छापा सांगलीतील राजारामबापू कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (RSBL) वर टाकण्यात आलाय. या बँकेशी संबंधित १००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात, शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव समोर येतय. सांगलीतील या घोटाळ्यात खोटी माहिती (केवायसी) देऊन अनेक खाती उघडून, त्यांच्यामार्फत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करण्यात आले. अशा दहा व्यवहारांची माहिती ईडीच्या हाती लागल्याचे कळतेय.

या प्रकरणात एका सीएची संशयास्पद भूमिका समोर आलीय, ज्याने अनेक लोकांना तयार करून त्यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या बनावट कंपन्या तयार केल्या आणि त्याद्वारे त्यांच्या खात्यात पैसे जमा केले. नंतर ते रोख स्वरूपात बँकेतून काढले. यात अनेक मोठ्या उद्योगपतींची नावे समोर येत आहेत, ज्यांच्या घरांवर ईडीच्या पथकाने शुक्रवारी छापे टाकले. त्यात पारेख बंधूंचे (दिनेश पारेख, सुरेश पारेख) नाव आघाडीवर आहे. यासोबतच ईडीच्या पथकाने पाच मोठ्या व्यापाऱ्यांच्या ठिकाणी जाऊन शोधमोहीम राबवली.

ईडीचे पथक शुक्रवारी सकाळी ९ वाजता घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर पहाटे अडीच वाजेपर्यंत त्यांची ही कारवाई सुरू होती. राष्ट्रवादीच्या सूत्रांनी याप्रकरणी महाराष्ट्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांचा संबंध नाकारला आहे. याबाबत सध्या जयंत पाटील यांच्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. या घोटाळ्याची सर्व माहिती बँकेकडे होती, ती माहिती जाणूनबुजून बँकेकडुन लपवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.

दरम्यान, मुंबई-पुणे येथील कोविड सेंटर घोटाळ्याबाबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या जवळच्या १६ हून अधिक लोकांच्या ठिकाणी छापे टाकल्यानंतर, ईडीने एक डायरी ताब्यात घेतली आहे. या डायरीत बीएमसीचे अनेक मोठे अधिकारी, कोविड केअरच्या नावाखाली घोटाळा करणारे डॉक्टर आणि मोठ्या लोकांना किती लाच देण्यात आली, या सर्वांची नोंद आहे. दोन दिवसांपूर्वी ईडीने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या घरावर छापे टाकले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा