मुंबई (ए एन आय), २१ सप्टेंबर २०२०: भिवंडीतील एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर आली आहे . भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड या परिसरातील जिलानी इमारत कोसळली आहे. पहाटे ३.४० च्या सुमारात ही दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली २०-२५ लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय.
या दुर्घटनेनंतर एन डी आर एफ आणि अग्निशमन दलाकडून तातडीनं बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. पहाटेच्या वेळी ही सर्व दुर्घटना घडल्यानं अनेक नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. या इमारतीत २५ कुटुंब वास्तव्यास होतीे.
पटेल कंपाऊंड येथील ही इमारत सुमारे ३० वर्षे जुनी एल टाइपमधील होती. या इमारतीला महापालिकेनं धोकादायक म्हणून घोषित केलं होतं. या इमारतीस दोन वेळा नोटीसही बजावण्यात आली होती. तरीही अनेक नागरिक या ठिकाणी राहत होते. या इमारतीचा एक भाग पूर्ण कोसळला असून दोन मजले हे जमिनीखाली गाडले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे