शेतकऱ्यांनी तुती लागवड करून आर्थिक प्रगती साधावी. – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना, १३ जानेवारी २०२४ : महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी पुढाकार घेवून चॉकी किटक संगोपन, निर्जंतुकीकरण पथक, तुतीच्या उर्वरित काड्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, रेशीम धागा रंगनी करून विणकामासाठी तयार करणे, हातमागावर रेशीम कपडाचे विणकाम करणे आदी प्रक्रीया करून आर्थिक उत्पन्न वाढविण्याची संधी जालना जिल्ह्यात आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. रेशीमची मागणी वाढत असली तरी रेशीम कोषांचा दर शाश्वत असल्यामुळे शेतकऱ्यांनी तुती लागवड करून आर्थिक प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

महारेशीम अभियान अंतर्गत शेतकरी मेळावा व प्रशिक्षण कार्यक्रम आज घनसावंगी येथील रयतेचे स्वराज्य चॉकी केंद्र येथे घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते रेशीम रत्न भाऊसाहेब निवदे यांचे रयतेचे स्वराज्य चॉकी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. महारेशीम अभियान अंतर्गत जालना जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक म्हणजेच १७६२ एकरची नोंदणी केल्याबद्दल संबधित अधिकारी – कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी अभिनंदन केले. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देवून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सूर्यवंशी, छत्रपती संभाजीनगरचे रेशीम विकास अधिकारी बबनराव डेंगळे, जालन्याचे रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, उपविभागीय कृषी अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार योगिता खटावकर, तालुका कृषी अधिकारी सखाराम पवळ, रेशीम विभागाचे कर्मचारी एस. आर. जगताप, एस. यु. गणाचार्य, जी. के. गीते, रेशीम धागा निर्मिती केंद्र चालक गणेश शिंदे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा