पुणे शहर तहसील कार्यालयाच्‍यावतीने एक लाख कापडी मास्कचे मोफत वाटप

पुणे,दि.१६ मे २०२०: उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍या मार्गदर्शनानुसार, पुणे शहर तहसिल कार्यालयाच्‍यावतीने पुणे शहरातील दाट लोकवस्तीच्या कंटेन्मेंट झोनमध्‍ये वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित १ लाख पांढरे सुती कापडी मास्कचे मोफत वाटप करण्‍यात आल्याची माहिती तहसीलदार तृप्‍ती कोलते पाटील यांनी दिली.

विशेष म्‍हणजे हे मास्क रोज घरी स्वच्छ धुवून पुन्हा वापरता येणार आहेत. किमान वर्षभर वापरता येतील इतका उत्‍कृष्‍ट दर्जा या मास्‍कचा आहे. जिल्हा प्रशासनातर्फे तहसील कार्यालय पुणे शहरकडून उपलब्‍ध झालेल्या एक लाख रियुजेबल मास्कचे मनपा क्षेत्रीय कार्यालयामार्फत कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना मोफत वितरण करण्‍यात आले आहे.

लॉकडाऊनमध्ये आणि लॉकडाऊननंतरही मास्‍क वापरणे अतिशय गरजेचे आहे. किमान वर्षभर किंवा त्याही पेक्षा जास्त काळ वापरावेच लागेल, अशी तरी सध्‍या परिस्‍थ‍िती आहे. मास्‍क वापरण्‍याबाबत अनेक जण गंभीर नसलेले दिसून येतात. मास्कचा वापर हा सहजतेने घेण्‍याचा विषय नाही. त्यामुळेच दाट लोकवस्तीच्या काही भागात काही सामाजिक संस्थांमार्फत मास्कचे वाटप झाले आहे. मात्र, ते तकलादू स्वरूपाचे आहेत. डिस्पोजेबल मास्कची  योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याने ते आणखी धोकादायक आहेत.

याबाबत तृप्‍ती कोलते-पाटील म्‍हणाल्‍या, मी या भागातून फिरत असताना बरेच नागरिक तोंडावर रूमाल बांधणे, काही महिला साडीचा पदर तात्पुरता तोंडाला लावणे,ओढणी, स्‍कार्फ गुंडाळून बिनधास्त रस्त्यावर फिरतात. हे फारच धोकादायक आहे. त्‍यांचे हे वर्तन स्‍वत:च्‍या आणि इतरांच्‍याही आरोग्‍याशी खेळणारे आहे.

योग्य संरक्षण न मिळाल्याने दाट लोकवस्तीच्या भागात कोविड १९ विषाणूचा संसर्ग वाढण्‍याचे मास्‍क न वापरणे हेही एक कारण ठरत असावे, असे मला वाटते. अधिकारी म्हणून एन ९५ सुरक्षित काही मास्क मला मिळालेही. पण ते फार काळ वापरू शकत नाही आणि आपल्याला तर किमान वर्षभर किंवा त्याही पेक्षा जास्त काळ मास्क वापरावेच लागणार आहेत. त्यामुळे माझ्याबरोबरच सामान्य नागरिकांसाठी रोज आपल्या घरी स्वच्छ धुवून किमान वर्षभर वापरता येतील, असे वैद्यकीयदृष्टया प्रमाणित दोन लेअरचे कापडी मास्क शासनाच्या वतीने  पुणे शहरातील कंटेन्मेंट झोनमध्‍ये वाटणार आहे.
मास्क वापरायला टाळाटाळ करू नका. डिस्पोजेबल मास्क वापरत असाल तर त्याची योग्‍य विल्हेवाट लावा. ते रस्त्यावर टाकू नका. रूमाल वापरणे सुद्धा फार सुरक्षित नाही आणि हलक्या दर्जाचे मास्क वापरणे तर फार धोकादायक आहे. असे आवाहनही कोलते पाटील यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा