पालकमंत्री अजित पवार यांचेकडून जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा

पुणे ४ ऑगस्ट २०२४ : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

श्री.पवार यांनी विभागीय आयुक्त, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त , जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूरपरिस्थितीबाबत माहिती घेतली. खडकवासला धरणातील विसर्ग दिवसा वाढवून पाणीसाठा ६५ टक्क्यांवर आणावा, जेणेकरून रात्रीच्यावेळी पाऊस झाल्यास नदीपात्रात अधिक विसर्ग करावा लागणार नाही. महापालिकेने ध्वनिक्षेपक आणि समाज माध्यमाद्वारे नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना द्याव्यात, त्यांना वेळोवेळी पुरपरिस्थितीची माहिती द्यावी, अशा सूचना दिल्या.

नदीकाठच्या सखल भागातील कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांना आवश्यक सुविधा पुरवाव्यात. आपत्तीच्या परिस्तिथीत प्रशासनाच्या मदत व बचाव यंत्रणेने गतिमान पद्धतीने प्रतिसाद द्यावा. सर्व यंत्रणांनी परस्पर संपर्कात राहून समन्वयाने काम करावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

जिल्ह्यातील विविध धरणातील पाणीसाठा, धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग, पावसाचे प्रमाण, हवामानाचा अंदाज, पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर याविषयीदेखील श्री.पवार यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. जिल्हा प्रशासन सतर्क असून सर्व यंत्रणा क्षमतेने मदत आणि बचाव कार्यात कार्यरत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता आपत्ती व्यवस्थापनात प्रशासनाला सहकार्य करावे. हवामान विभागाने आजच्या दिवसासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव, भाटघर, मुळशी अशा विविध धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे.

नागरिकांनी नदीकाठच्या धोकादायक भागातून सुरक्षित स्थळी किंवा प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या शिबिरात स्थलांतरित व्हावे. प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी कार्यरत असून नदीपात्रापासून दूर रहात प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले आहे.

दरम्यान विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी एकता नगर परिसराला भेट दिली. तेथील मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून त्याचा आढावाही अधिकाऱ्यांनी घेतला. अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान भारतीय लष्कराची एक तुकडी मदतकार्यासाठी दाखल झाली आहे. या तुकडीत १०५ जवान आहेत. आवश्यकता असल्यास आणखी एक तुकडी राखीव म्हणून तयार ठेवण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : जयश्री बोकील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा