मुंबई, २३ ऑगस्ट २०२३ : सनी च्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या गदर-२ च्या यशाची प्रेरणा घेऊन अनेक चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या मागील हिट चित्रपटांचे सिक्वेल बनवण्याचा विचार करण्यास भाग पाडले, यात आता सुभाष घई हे मोठे निर्माता दिग्दर्शकही आहेत. त्यांनी त्यांच्या ‘खलनायक’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल ‘खलनायक-२’ची घोषणा केली आहे.
काही दिवसांपूर्वी सुभाष यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली की, मीडिया अजूनही ‘खलनायक’ आणि तरुण पिढी संजय दत्तचे पात्र बल्लू बलरामशी कनेक्ट आहे आणि त्याच्या सिक्वेलची मागणी करत आहे. अशा पोस्ट मधुन घई यांनी खलनायक-२ बनवण्याबाबत चर्चा केली. याआधीही सुभाष घई म्हणाले होते की, ‘गदर-२ च्या यशानंतर मला अनेक संदेश आले की, मी खलनायक-२ का बनवत नाही?
या सगळ्या चर्चेवर आता सुभाष घईंनी आता उत्तर दिले आहे की, आम्ही खलनायक-२ वर काम करणार आहोत आणि लवकरच तुम्हाला त्याबाबतची बातमी मिळेल. या चित्रपटात मी संजय दत्तच्या विरुद्ध एका नव्या स्टारची ओळख करून देणार आहे. याशिवाय घई म्हणाले की, ‘खलनायक’, ‘कर्मा’ ‘सौदागर’ आणि ‘परदेस’ हे सर्व आयकॉनिक चित्रपट आहेत आणि अनेक निर्माते आणि स्टुडिओने या चित्रपटांचा रिमेक किंवा सिक्वेल बनवण्याबाबत माझ्याशी संपर्क केला आहे. याबाबत आमच्याकडे काही कंटेन्ट आहे आणि आम्ही त्याच्यावर सतत काम करत आहोत. लोकांना जुन्या गोष्टीत रमणे आवडते. जुन्या खलनायकाचा बल्लू बलराम हा आत्ताच्या पडद्यावर शानदार एन्ट्री करणार आहे.
६ ऑगस्ट १९९३ रोजी रिलीज झालेल्या, माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ अभिनीत खलनायक चित्रपटाने नुकतीच ३० वर्षे पूर्ण केलीयत, याच औचित्य साधून ‘खलनायक २’ वर काम सुरू करण्यापूर्वी सुभाष घई ४ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाचा पहिला भाग पुन्हा प्रदर्शित करणार आहे. १०० हून अधिक स्क्रीनवर तो पुन्हा देशभरात रिलीज करणार आहेत. ‘खलनायक’ने बॉक्स ऑफिसवर २३ कोटींचा व्यवसाय केला होता. त्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारा हा दुसरा चित्रपट होता. चित्रपटातील गाणीही सुपरहिट ठरली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे