बिपरजॉय धडकण्यापूर्वीच पश्चिम किनारपट्टीला जोरदार वाऱ्याचा तडाखा, तीन ठार तर ६७ रेल्वे गाड्या रद्द

गुजरात १३ जून २०२३: अत्यंत तीव्र चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ गुजरातच्या जखाऊ मासेमारी बंदराजवळ धडकण्यापूर्वीच जोरदार वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सौराष्ट्रमध्ये जोरदार पावसासोबतच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पडझड होऊन दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला आहे. भूज शहरात भिंत कोसळून एक चार वर्षांचा मुलगा आणि एक सहा वर्षांची मुलगी यांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील जसदन तालुक्यात, जोरदार वाऱ्यामुळे राज्य महामार्गावर एका मोटरसायकलवर झाड पडल्याने महिला ठार झाली. तर तिचा पती जखमी झाला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे,पश्चिम रेल्वेने गुजरातच्या किनारी भागात जाणाऱ्या ६७ गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्या एक किंव्हा अधिक दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.

बिपरजॉयमुळे कच्छ आणि द्वारका येथील १२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येणार आहे. या दोन जिल्ह्यांना चक्रीवादळचा सर्वाधिक फटका बसण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. आज रात्रीपर्यंत लोकांना स्थलांतरित केले जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. गुजरातच्या किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकण्याच्या एक दिवस आधीच या भागात जोरदार पाऊस आणि सुसाट वारे सुरू झाले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा