बाजार अभावी कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात

इंदापूर, दि. २९ एप्रिल २०२०: संपूर्ण जगभरात कोरोना ने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सगळीकडे लॉकडाउन ची परिस्थिती आहे. त्यामुळे रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या मालाला ग्राहक नसल्याने कवडीमोल भाव मिळत आहे. अशीच अवस्था सध्या कलिंगड उत्पादक शेतकऱ्याची झाली आहे. लाखो रुपये खर्च करून अगदी कलिंगड फुकट वाटण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, इंदापूर तालुक्यातील न्हावी, बोराटवाडी, पळसदेव, लोणी देवकर आणि इतर परिसरातील शेतकऱ्यांनी जवळपास शेकडो एकर कलिंगड लागवड केली आहे. न्यूज अनकटशी बोलताना, यातीलच शेतकरी रामदास बोराटे यांनी, कलिंगडास अडीच महिन्यात सुमारे पावणेदोन लाख रुपये उत्पादन खर्च आला आणि उत्पादन केवळ सव्वीस हजार रुपयेच मिळाले असल्याचे अगदी रडकुंडीला येऊन सांगीतले.

कलिंगडासाठी केलेले सगळे कष्ट कोरोनामुळे माती मोल झाले. दोन एकर क्षेत्रात मोठ्या कष्टाने, रात्रीचा दिवस करून सुमारे ५० टन कलिंगडाचे विक्रमी उत्पादन काढले. यातून किमान पाच लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र निराशाच पदरी आली.
रामदास बोराटे यांनी दोन एकर क्षेत्रात नांगरट करून त्यात बेड सोडून मल्चिंग पेपर अंथरून त्यात कलिंगडाची लागवड केली. अडीच रुपयाला एक या प्रमाणे चौदा हजार शुगरकिंग व मॅक्स जातीच्या रोपाची लागवड केली त्यासाठी ३६ हजार रुपये खर्च आला. पीकाला संपूर्ण दोन एकरासाठी ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन पिकाची जोपासना केली. साधारणतः ४ ट्रेलर शेणखत सुमारे २० हजार रुपयांना विकत घेऊन कलिंगडासाठी टाकले. सोबतच इतर रासायनिक खते वापरली त्यासाठी सुमारे तीस हजार रुपयांचा खर्च आला. आठवड्यातून दोन वेळा औषध फवारणी करून रोगापासून कलिंगडाचे रक्षण केले.

रात्रीचा दिवस करून पिकाची जोपासना केली. प्रथमच शेतात कलिंगड पिकाची लागवड केली होती त्यामुळे मोठा उत्साह होता. मोठ्या जोमाने मोठं मोठी कलिंगड शेतात आली. यातच पहिली दहा टनाची गाडी मुंबईला पाठवली आणि देशात कोरोनाने जोर धरला. माल खपता खपेना. अगदी कसेबसे सव्वीस हजार रुपये हातात पडले. बाकी कलिंगडे आता व्यापारी एक रुपया, दोन रुपये किलो दराने मागत आहेत. त्यामुळे वैतागून आपल्या मालाची झालेली अवहेलना पाहून अगदी मातीमोलाने विकण्यापेक्षा गावातील व आसपासच्या नातेवाईकांना वाटून टाकली. अगदी केलेला खर्च देखील निघाला नसल्याने पदरी मोठी निराशा आली. आता शिल्लक असलेली कलिंगडे घराजवळ असलेल्या झाडाखाली, मोठा ढीग लावून ठेवली आहेत.

अशाच परिस्थितीत असणारे इंदापूर येथील कलिंगड शेतकरी आका मोहन राऊत यांनी तर कलिंगडाला एक आणि दोन रुपये भावाने मागणी झाल्यावर वैतागून, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या कामगारांना मोफत वाटून टाकली असल्याचे सांगितले.

शासनाने आमच्या या पिकाचे झालेले नुकसान पाहून किमान आम्हाला झालेला खर्च तरी मिळावा अशी मागणी रामदास बोराटे यांनी केली आहे. शिवाय पीक विमा याबाबत या भागातील कृषी सहाय्यक यांच्या कडून कसलीच माहिती मिळत नाही, त्यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तरी यापुढेही आम्हाला कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास आम्हाला मदत होईल असे मत व्यक्त केले. एकंदरीत कलिंगड शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी या बाबत तातडीने पंचनामे करून कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी मागणी कलिंगड उत्पादक शेतकऱ्याकडून होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा