जी २० देशांच्या वित्त मंत्र्यांसोबत निर्मला सीतारमन यांची बैठक

नवी दिल्ली, २७ फेब्रुवरी २०२१: केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन काल जी २० देशांचे वित्त मंत्री आणि सेन्ट्रल बँक गव्हर्नर यांच्या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहिल्या.

इटलीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पहिल्या बैठकीत अर्थव्यवस्था परिवर्तनशील आणि न्याय्य पद्धतीने पूर्वपदावर आणण्यासाठी धोरणात्मक कृती, जागतिक आर्थिक परिदृश्य, वित्तीय क्षेत्रातले मुद्दे, वित्तीय समावेश आणि शाश्वत वित्त व्यवस्था यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होती.

कोविड महामारीला भारताने दिलेल्या धोरणात्मक प्रतिसादाबाबत वित्त मंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. भारताची देशांतर्गत धोरणे,व्यापक प्रमाणात नागरिकांना सहाय्य करण्यावर आधारित आहेत. यामध्ये पत हमी, थेट हस्तांतरण, अन्न सुरक्षा, आर्थिक प्रोत्साहन पॅकेज आणि संरचनात्मक सुधारणांना गती यांचा समावेश आहे असे त्यांनी सांगितले. जगातल्या सर्वात मोठ्या आणि महत्वाकांक्षी अशा भारताच्या लसीकरण कार्यक्रमाबाबत मंत्र्यांनी यावेळी माहिती दिली.भारताने अनेक देशांना लसी बाबत सहाय्य केल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

जागतिक हवामान बदलाचा जागतिक विकास आणि वित्तीय स्थैर्य यावर होणाऱ्या परिणामांची जी २० देशामधील वित्त मंत्री आणि सेन्ट्रल बँक गव्हर्नर यांनी बैठकीत चर्चा केली. हवामान जोखीम आणि पर्यावरण करप्रणाली याबाबत सुनियोजित धोरण संवाद घेण्याच्या अध्यक्षीय प्रस्तावावर बोलताना हा संवाद पॅरिस कराराच्या चौकटीत राहून आणि सामायिक मात्र वेगवेगळी जबाबदारी या तत्वावर आधारित आणि ऐच्छिक स्वरूपाच्या कटिबद्धतेवर असावा असे सीतारामन यांनी सुचवले. हरित तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि हवामान विषयक वित्तीय पाठबळाचे प्रमाण वाढवण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा