पुण्यासह मुंबई, भुसावळ आणि नागपूर रेल्वे स्थानके सौर ऊर्जेने उजळणार, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

पुणे, १८ जुलै २०२३ : रेल्वे विभागाकडून देशात अनेक वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. देशातील अनेक रेल्वे स्थानकांचे आधुनिकरण करण्यात येत आहे. प्रवाशांसाठी अनेक सोयी सुविधा निर्माण केल्या जात आहेत. अनेक मार्गांवर नवीन रेल्वे सुरु केल्या जात आहेत. तसेच रेल्वे आपल्या पायाभूत सुविधाही अधिक भक्कम करत आहे. आता भारतीय रेल्वेने आपली रेल्वे स्थानके सौर ऊर्जेने प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पुणे, मुंबई, भुसावळ आणि नागपूर स्थानकांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेने ४.१०५ मेगावॅट वीज निर्मितीसाठी प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकांवर रुफटॉप म्हणजेच सौर पॅनल बसवून वीज निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी पुणे, भुसावळ, नागपूर आणि मुंबई या ठिकाणी पब्लिक प्राईव्हेट पार्टनशिपमध्ये प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर या ठिकाणी सौर ऊर्जेत स्थानके झळाळणार आहेत.

सौर उर्जा प्रकल्प दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या प्रकल्पात १० किलोवॅट ते १०० किलोवॅट पर्यंत वीजनिर्मिती केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १०० किलोवॅट ते ५०० किलोवॅट पर्यंत वीजनिर्मिती केली जाणार आहे. या माध्यमातून ४.१०५ मेगावॅट वीज निर्मिती चार स्थानकावर होणार आहे. त्यात पुणे, मुंबई, नागपूर आणि भुसावळ स्थानकाचा समावेश आहे.रेल्वेने सौर उर्जा प्रकल्प निर्मितीसाठी निविदा मागवल्या आहेत. २८ ऑगस्ट २०२३ पर्यंत यासाठी निविदा सादर करता येणार आहे. हा प्रकल्प ८ महिन्यात पूर्ण करावा लागणार आहे. तसेच विकासकांना २५ वर्षांपर्यंत या प्रकल्पाचे मेंटनन्स करावे लागणार आहे.

भारतात पहिले सौर उर्जेवरील स्थानक चेन्नईत सुरु झाले. या ठिकाणी असलेले थलाईवा डॉ. एम. जी. रामचंद्रन सेंट्रल स्थानक शंभर टक्के सौर उर्जेवर चालते. या रेल्वे स्थानकास चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक म्हणूनही ओळखले जाते. या रेल्वे स्थानकावर सौर पॅनेल्स बसवून उर्जा निर्मिती केली जाते. या ठिकाणी १.५ मेगावॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसवले गेले आहे. यामुळे या स्थानकावरील विजेची गरज पूर्णपणे भागवली जाते.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा