पुणे, १ जानेवारी २०२१: पुण्याच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भामा-आसखेड योजनेचा लोकार्पण आज पुण्यात करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान भाजपचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आलेले दिसले.
एकीकडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर ती असताना एकमेकांसोबत स्टेज शेअर करत असताना या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, दोघांची समर्थक बाहेर मात्र एकमेकांच्या विरोधात, एकमेकांच्या नेत्यांच्या विरोधात अगदी बेंबीच्या देठापासून घोषणा देत होते. खरतर या दोन्ही नेत्यांचे संबंध कसे आहे ते मागील वर्षी आपण सगळ्यांनी पाहिले होते. परंतु, बाहेर या दोन पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले होते. अगदी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. काही वेळापूर्वी या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांपासून दूर करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, अजूनही या ठिकाणी कार्यकर्ते आहेत.
महानगरपालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम सुरू आहे. या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते पुन्हा एकत्र येऊ नयेत यासाठी अक्षरशः पोलिसांना बॅरिकेड्स लावण्याची वेळ आली आहे. अर्थात एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्याला पार्श्वभूमी आहे ती एका वर्षावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकांची.
दरम्यान यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ” आलिकडच्या काळामध्ये अजित पवारांसोबत कार्यक्रम आपण केला की दोन दिवस आधी, दोन दिवस नंतर त्या बातम्या चालतात आणि अशा प्रकारच्या देखील बातम्या अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. याची कधीच पर्वा करायचे कारण नाही. जनते करता जिथं जावं लागेल तिथं आपण जायचं, ते काम करायचं.”
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे