औरंगाबाद, १ डिसेंबर २०२२ : मुंबई ते नागपूर या ७२० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी या ५२० किलोमीटरच्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. अद्याप वरिष्ठ पातळीवरून काहीही सूचना आल्या नाहीत; मात्र लोकार्पणाची तारीख निश्चित मानली जात आहे. ११ डिसेंबर रोजी नागपूर येथूनच ५२० किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे पंतप्रधानांकडून लोकार्पण होईल. समृद्धी महामार्ग ७०१ किलोमीटर लांबीचा असून, तो १० जिल्हे २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार आहे. यामध्ये ११२ किलोमीटर लांबीचा समृद्धीचा ३४०० कोटींचा टप्पा लवकर लोकापणासाठी पूर्ण झाला आहे.
लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने राज्य रस्ते विकास मंडळाने तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी या मार्गाची किमान औरंगाबादपर्यंत हवाई पाहणी करण्याची शक्यता ‘एमएसआरडीसी’च्या वरिष्ठ सूत्रांनी वर्तविली आहे. लोकार्पणाचा कार्यक्रमासाठी वेगळी समिती स्थापन होईल. या समितीमध्ये लोकार्पण अशी निगडित सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल.
मराठवाड्यातील विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडले गेलेले दोन विभाग काही तासांच्या अंतरावर येणार आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. औरंगाबाद तालुक्यातील ३५ गावे, वैजापूरमधील १५ गावे, तर गंगापूर येथील ११ गावांतील जमिनी महामार्गासाठी संपादित केल्या आहेत. त्याचप्रमाणे जालना जिल्ह्यातील २५ गावांतील भूसंपादन झाले आहे. या महामार्गाचे काम १६ पॅकेजेसमध्ये करण्यात आले आहेत. त्यातील ८, ९ आणि १० ही ३ पॅकेजेस पूर्ण झाली आहेत. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांतून हा महामार्ग गेला आहे. मध्यंतरी अपघाताचे प्रमाण वाढल्याने वेगामर्यादा ताशी १५० किलोमीटरवरून १२० पर्यंतही आणण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी हा महामार्ग खूप सुलभ ठरणार आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे