पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणेला पोलिसांनी साताऱ्यात ठोकल्या बेड्या

पुणे, १७ ऑक्टोबर २०२२ : पुणे पोलिसांनी साताऱ्यातील वाई परिसरात एक मोठी कारवाई केली. कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका शेअर दलालाचे वीस कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पोलीस गज्या मारणेचा शोध घेत होते. या प्रकरणी पोलिसांनी गज्या मारणे टोळीच्या जवळपास सहा गुंडांना अटक केली आहे. आता पोलिसांनी सातवी अटक गज्या मारणेची केली आहे. त्याचे साथीदार पोलिसांच्या हाती लागल्यापासून तो फरार होता.

कुप्रसिद्ध गुंड गज्या मारणे याच्यावर याआधीदेखील अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्याच्यासह आणखी चौदा जणांवर, नुकताच एका शेअर दलालला वीस कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस गज्या मारणेचा शोध घेत होते. पण तो पोलिसांना हुलकावणी देत होता. विशेष म्हणजे या प्रकरणातून आपली सुखरुप सुटका व्हावी यासाठी तो वकिलाकडे देखील गेला. परंतु पोलिसांनी त्याला योग्यवेळी बेड्या ठोकल्या.

पोलिसांना गज्या मारणेला अटक करणे मोठे जिकिरीचे काम होते. त्याला बेड्या ठोकणे ही पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात आहे. पुणे पोलिसांनी गज्या मारणेला साताऱ्यातील वाई परिसरातून एका फार्म हाऊसवरुन ताब्यात घेतले. हे फार्म हाऊस ॲड. विजयसिंह ठोंबरे यांचे आहे. गज्या मारणे वाई परिसरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलीस साताऱ्यात दाखल झाले. त्यांनी फार्म हाऊसवर दाखल होत गज्याला बेड्या ठोकल्या.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा