राखी सावंतचा भाऊ राकेशला मुंबई पोलिसांकडून अटक ,२२ मे पर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी

मुंबई, १० मे २०२३: बाॅलिवूडची अभिनेत्री राखी सावंत काही ना काही कारणांमुळे कायमच चर्चेत असते. राखीने काही दिवसांपूर्वी तिचा पती आदिल दुर्रानीवर घरगुती हिंसाचार, चोरी, फसवणूक असे अनेक आरोप केले होते. त्यानंतर आदिलवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. आता राखीचा भाऊ राकेश सावंत याला पोलिसांनी अटक केली आहे. राखी सावंतचा भाऊ राकेश याला चेक बाऊन्सप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राकेशला ओशिवरा पोलिसांनी ७ मे रोजी अटक केली होती. त्यानंतर त्याला ८ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने राकेशला २२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राकेश सावंत हा दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक आहे.

एका व्यावसायिकाने २०२० मध्ये राकेश सावंत विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राकेशला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राकेशची जामिनावर सुटका करण्यात आली होती. चेक बाऊन्स प्रकरणी त्या व्यावसायिकाला पैसे परत करावेत,या अटीनुसार जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने दिलेली ही अट राकेशला पूर्ण करता आली नाही. यामुळे राकेशला १३८ ए , कोर्ट केस ९६ / एस एस /२०२१ अंतर्गत जामिनपत्र वाॅरटवर पुन्हा अटक करण्यात आली आहे. राकेश सावंत याला येत्या २२ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे .

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विजय सपकाळ

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा