या सापाला मराठीत तिडक्या साप, उडता साप, शेलाटी, उडता सोनसर्प अशी नावे आहेत. हा दक्षिण आणि आग्नेय आशियात आढळणारा साप आहे. सहसा झाडांतून राहणारा हा साप फांद्यांतून लांब उड्डाणावजा उड्या मारू शकतो आणि सूर्यप्रकाशात चमकतो, म्हणून याला उडता सोनसर्प असे म्हणतात.
भारताच्या नैर्ऋत्य व ईशान्य भागांतील पर्वतीय वने तसेच उत्तर बिहार आणि ओरिसा राज्यात हा फ्लाइंग स्नेक आढळतो. समुद्रसपाटीपासून दोन हजार मीटर उंचीपर्यंत हे साप आढळून येतात. या सापाची पॅरेडाइज फ्लाइंग स्नेक (C. Paradisi) नावाची उपजात अंदमान बेटातील नारकोश डॅम येथे आढळून येते.
उडता सोनसर्प हा लहान तसेच मध्यम आकाराचा असून अंगाने काठीसारखा गोल, सडपातळ व पाठीवर गुळगुळीत खवले असतात. याच्या पाठीवरच्या भागावर काळ्या, पिवळ्या व तांबड्या रंगाची चकचकीत नक्षी असते. खालचा भाग हिरवट असतो. सरपटताना त्याच्या पोटाकडील बाजूच्या खवल्यांना घड्या पडतात. झाडावर चढण्यासाठी त्याला अशा खवल्यांचा उपयोग होतो. डोक्यावरही चकचकीत पट्टे असतात. डोके व अंगावरील ही नक्षी अधिवासानुसार निराळी असते.
हे साप उंच व मोठी झाडे तसेच घनदाट जंगलात राहतात. श्रीलंका व थायलंड या भागांत मात्र ते घरासमोरच्या बागेत दिसून येतात. ते दिवसाच बाहेर पडतात. शत्रूपासून स्वतःचा बचाव करून घेण्याकरिता उड़ते सोनसाप झाडाच्या फांद्यांवरून उड्या घेतात. या सापाच्या उडण्याच्या पद्धतीचे चित्रीकरण करून, त्यावर अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे. उडी मारताना ते आपले अंग ताणतात व पोट आत ओढून घेतात, त्यामुळे शरीर पसरले जाऊन खालच्या भागात थोडा खोलगट भाग तयार होतो. यामुळे ते संथ गतीने तरंगत वरून खाली येतात, इतर सापांप्रमाणे धपकन खाली पडत नाहीत. हा साप एका उंचीवरच्या फांदीवरून दुसऱ्या कमी उंचीवर असणाऱ्या फांदीवर सहज उडी मारतो म्हणजेच उडत जातो, ते पाहून आपणांला आश्चर्य वाटते.
उडता सोनसर्प या सापाची सरासरी लांबी तीन ते साडेतीन फुटापर्यंत असते. सर्पतज्ज्ञाच्या म्हणण्याप्रमाणे या जातीची मादी सहा ते बारा अंडी घालते. त्यांनी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात अंडी घातलेली निदर्शनास आली आहे. उडता सोनसर्पचे भक्ष्य बेडूक, सरडे, पाली, लहान पक्षी आणि त्यांची अंडी आहे. ते जिवंत भक्ष्य गिळतात. त्यांच्या मुळ्यासारख्या पुढील दातांतील किंचित विषयुक्त लाळेमुळे भक्ष्याची हालचाल बंद होते.
पश्चिम घाटात हे साप आढळून आले आहेत. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अधून मधून हा उडता सोनसर्प सापडतो, अगदी सोलापूर सारख्या ओसाड भागात हा काही काळापूर्वी सापडला होता. बंगालमध्ये या जातीचे जिवंत सर्प बाजारात विकले जातात. हा साप विषारी असला तरी माणसाला हानीकारक होईल इतका विषारी समजला जात नाही. हा निम्न विषारी साप आहे. याचे विष त्याच्या छोट्या छोट्या भक्षासाठी बनले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.