जालना ९ मार्च २०२४ : आगामी लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू होणार असून शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांनी आपल्या अधिनस्त मालमत्तेवरील पोस्टर्स, बॅनर, झेंडे, रंगविलेला मजकूर, होर्डिंग वेळेत काढून घेण्याचे नियोजन करावे तसेच आचार संहितेच्या पार्श्वभूमीवर आणि निवडणुकीच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कामे पार पाडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले. लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर क्षेत्रिय अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शशिकांत हदगल आदींसह सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, जालना लोकसभा मतदार संघातील क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी आपल्या कामात सजग राहण्याबरोबरच प्रशिक्षण, माहिती देणे, आचारसंहितेचे पालन होते की नाही ते पाहणे आदी कामे चोखपणे पार पाडावीत.
आचारसंहिता पथक, मतदान कर्मचारी व्यवस्थापन कक्ष, प्रशिक्षण पथक, निवडणूक साहित्य पथक, वाहतुक व्यवस्था पथक, आयटी सेल पथक, स्वीप पथक, कायदा व सुव्यवस्था पथक, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पथक, निवडणूक खर्च पथक, बॅलेट व पोस्टर बॅलेट पेपर पथक, मिडीया कक्ष पथक, संवाद पथक, मतदार यादी कक्ष पथक, तक्रार निवारण कक्ष, निवडणूक निरीक्षक पथक, सुविधा पथक, मतमोजणी पथक, ओळखपत्र निर्गमित पथक, वेबकास्टींग कंट्रोल रुम पथक, मानधन कक्ष पथक, आदेश वितरण पथक, परवानगी कक्ष पथक, अवैध दारु वाटपास प्रतिबंध पथक आदींचा त्यांनी सविस्तर आढावा घेत विविध सूचना केल्या. यावेळी स्वीपच्या लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी