संचारबंदीमुळे रीक्षाचालकांवर उपासमारीची वेळ, मदतीची मागणी

बारामती (प्रतिनिधी- अमोल यादव) राज्यभरातील अनेक रिक्षा चालकांचा उदरनिर्वाह हा फक्त रिक्षा असून अनेकांच्या डोई कर्जाचे ओझे आहे. शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ येत आहे.शासनाने यातुन मार्ग काढण्यासाठी रीक्षाचालकांना मदतीचा हात देण्याची मागणी पुढे येत आहे.

रिक्षा चालक वगार्ला मास्क व सॅनिटायझर मोफत उपलब्ध करून द्यावे,प्रत्येकी रिक्षा चालकांना ह्या बिकट प्रसंगात आर्थिक मदत करण्यात यावी,त्यांच्या कर्जाच्या व्याजांचे हफ्ते ह्या काळात माफ करण्यात यावे आदी मागण्या बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटना व बारामती उपपरिवाहन विभाग अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड येथील सर्व रिक्षा संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे घर कसे चालवायचे, असा प्रश्न बारामतीतील रिक्षा चालकांसमोर उभा ठाकला आहे. लॉकडाऊनमुळे आॅटो रिक्षा सध्या बंद असल्यामुळे चालक मालक संकटात आहेत. या संकटकाळात आॅटो रिक्षा’वाल्यांच्या मदतीला कोणीही धावून येताना दिसत नाही. त्यांना मदतीची आवश्यकता असल्याचे येथील राष्ट्रवादी काँगेस आॅटो रिक्षा संघटनेच्या रिक्षा चालकांनी सांगितले. शहरात अंदाजे सतराशेच्या आसपास आॅटो रिक्षा आहेत. त्यावर रिक्षावाल्याचे कुटुंब चालत आहे. त्यामुळे या लॉकडाऊन काळात रिक्षा चालकांचे घर चालविण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेस आॅटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी हरिश्चंद्र शिंदे, आकाश चव्हाण, रेवणसिद्ध कोरे, तानाजी कुंभार, हेमंत चव्हाण, सखाराम सोनवणे, बाबुराव गायकवाड, अशोक कांबळे इत्यादी आॅटो रिक्षा चालक व्यक्त करीत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा