पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीला भाविकांची लक्षणीय घट, भाविकांनी फिरवली यात्रेकडे पाठ

पंढरपूर, ३ नोव्हेंबर २०२२ : मागील महिन्यात राज्यात सर्वत्र परतीचा मुसळधार पाऊस झाला. यामुळे यावर्षी पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेलाही याचा फटका बसला असून यात्रेकरूंच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या निवासासाठी भक्तिसागर या निवासतील निम्मे प्लॉट रिकामे राहिल्याने यात्राकाळात कायम गजबजलेला हा भक्तिसागर रिकामा राहिला आहे.

कार्तिकी यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातुन यात्रेकरू येत असतात. राज्यभर यावर्षी परतीच्या पावसाने हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यानंतर शासनाकडून या नुकसानीचे पंचनामे अजून सुरूच असल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकरी वर्गाने यावर्षी कार्तिकी यात्रेकडे पाठ फिरवली आहे. आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरातरस्ते रिकामे आहेत. यात्रेकरूंच्या निवासासाठी उभारलेल्या भक्तिसागरमध्ये जवळपास तीन लाखाहुन अधिक भाविक दरवर्षी निवास करतात. मात्र, यावेळी अवघ्या १ लाख ६८ हजार भाविकांनी निवासाची नोंदनी केली असून बहुसंख्य प्लॉट रिकामे असल्याने या परिसरात यात्रेचे वातावरण देखील पाहायला मिळत नाही.

यात्रेनिमित्त भाविकांसाठी मोफत निवासाची व्यवस्था केली असून येथे भाविकांना रस्ते , वीज , पाणी आणि आरोग्याच्या सुविधा मोफत देण्यात आल्या आहेत. परंतु या वर्षी कार्तिकी एकादशीला निम्म्यापेक्षा जास्त भाविकांनी पाठ फिरविल्याने यात्राकाळात गजबजलेले असणारे पंढरपूर रिकामे दिसत आहे. कोरोना प्रादूर्भावानंतर दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात होणारी यात्रा विक्रमी होईल अशी अपेक्षा होती . परंतु परतीच्या पावसामुळे यात्रेकरूंनी,वारकर्यांनी कार्तिकी यात्रेकडे पाठ फिरवल्यामुळे व्यापारिवर्गाला देखील याचा मोठया प्रमाणात परिणाम होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा