सौर पॅनेलचा कचरा ठरणार पर्यावरणासाठी सर्वात धोकादायक, पुढील पंचवीस वर्षात २०० दशलक्ष टन इतक्या कचऱ्यामुळे होणार इको-डिझास्टर

नवी दिल्ली १३ जून २०२३ : पर्यावरण पूरक म्हणून आपल्याला सौर पॅनेल परिचित आहे. तज्ज्ञांच्या मते, गेल्या अनेक वर्षांपासून जगात सौर पॅनेलचा वापर पर्यावरण पूरक म्हणून केला जात आहे. जगात त्यांची संख्या अंदाजे २.५ अब्ज झाली आहे. पण आता या सौर पॅनेलचे आयुष्य संपण्याची वेळ जवळ आली आहे, म्हणजेच ते लवकर खराब होऊन कचरा बनू शकतात. वास्तविक, सौर पॅनेलचे आयुष्य २५ वर्षे आहे. २०३० पर्यंत जगभरात ४ दशलक्ष टन सौर कचरा जमा होईल, ज्याचे व्यवस्थापन करता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे, परंतु यापेक्षा जास्त कचरा साचल्याने गंभिर समस्या निर्माण होऊ शकतात.

आज पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या वाढत्या कार्बन उत्सर्जनाशी लढण्यासाठी, सौर पॅनेलकडे एक शस्त्र म्हणून पाहिले जाते. पण आता सौर पॅनेल बाबत गंभीरपणे विचार करावा लागेल, कारण की हे सोलर पॅनल्स खराब झाल्यानंतर धोक्याचे ठरू शकतात. खराब झाल्यामुळे किंवा जुनं झाल्याने सोलर पॅनल्सचा मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतोय आणि भविष्यातही होणार आहे. यामुळे इको-डिझास्टर म्हणजेच पर्यावरणीय अति गंभीर समस्या उद्भवू शकतात. सौर पॅनेलमध्ये उष्णता हस्तांतरित करण्यासाठी काही द्रव वापरले जातात. हे द्रव कधीकधी लीक होऊन गळतात, जे पर्यावरण आणि मानवी जीवनासाठी धोकादायक आहे.

सन २०५० पर्यंत जगभरात २०० दशलक्ष टन सोलर पॅनल कचरा जमा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. जगातील कोणत्याच देशाची या कचऱ्याचा पुनर्वापर करण्याची तयारी नाही. फ्रान्समध्ये या जून २०२३ मध्ये सौर पॅनेल रीसायकलिंग फॅक्टरी उघडली जाणार असली, तरी केवळ एकच कारखाना जगाच्या समस्या सोडवू शकत नाही. यामुळे इको-डिझास्टर आल्यास अनेक आजार होऊ शकतात. हा कचरा मातीची गुणवत्ता देखील खराब करू शकतो.

आधीच वायू प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक स्तरावर कोळसा, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू यांचा ऊर्जेसाठी सर्वाधिक वापर केला जातो. जगाच्या एकूण कार्बन उत्सर्जनात जीवाश्म इंधनाचा वाटा सर्वात मोठा आहे. उत्सर्जन कमी करण्यासाठी कोळशावरील आपले अवलंबित्व कमी करावे लागेल. त्यासाठी सौरऊर्जेचा अवलंब केला जात आहे.

२०५० पर्यंत पृथ्वीचे तापमान दोन अंशांनी वाढेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असे झाल्यास काही ठिकाणी भीषण दुष्काळ तर काही ठिकाणी विनाशकारी पूर येईल. हिमनद्या वितळतील, समुद्राची पातळी वाढेल. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर वसलेली अनेक शहरे पाण्यात बुडून त्यांची नावे पुसली जाणार आहेत. वेळीच हा धोका ओळखून त्यावर आताच उपाययोजना करावी लागेल.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा