पांजशिर, ४ सप्टेंबर २०२१: अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेतल्यानंतर सुमारे २० दिवसांनी आणि सरकार स्थापनेच्या काही काळापूर्वीच तालिबानने पंजशीर खोऱ्यावर कब्जा केल्याचा दावा केला आहे. मात्र, माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी तालिबानचा दावा फेटाळून लावत, लढाई अजूनही सुरू असल्याचे म्हटले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह हे तालिबानच्या विरोधात पंजशीर प्रांतात मोर्चा उघडत आहेत. तालिबान आणि मसूद यांच्यात सुरुवातीचे काही दिवस चर्चा चालली, पण त्यावर तोडगा निघू शकला नाही. यानंतर तालिबानने आपले लढाऊ पंजशीर काबीज करण्यासाठी पाठवले.
काबूलमध्ये गोळीबार करत आनंद व्यक्त केला
तालिबानने पंजशीर ताब्यात घेतल्याचा दावा वृत्तसंस्था रॉयटर्सने कट्टर संघटनेच्या सूत्रांच्या हवाल्याने केला आहे. तालिबानच्या तीन सूत्रांनी सांगितले की, आता तालिबान लढाऊंचा संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा आहे, ज्यात पंजशीरचा समावेश आहे. पंजशीर खोऱ्यात तालिबान आणि विरोधी गटांमध्ये संघर्ष सुरू होता. पंजशीर ताब्यात घेतल्यानंतर तालिबान लढाऊंनी राजधानी काबूलमध्ये आनंद व्यक्त करत आकाशात गोळीबारही केला.
सालेह यांनी पंजशीरचा ताबा फेटाळला
अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती आणि स्वयंघोषित काळजीवाहू अध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी तालिबानशी लढाई सुरू आहे आणि सुरूच राहील असा दावा करणारे ट्विट केले. मी माझ्या मातीसोबत आहे आणि तिच्या सन्मानाचे रक्षण करतो. त्याचवेळी, पंजशीरशी संबंधित ट्विटर अकाऊंटने म्हटले आहे की, पाकिस्तान, रशिया आणि चीन पंजशीर प्रतिकारविरोधी प्रचार चालवत आहेत.
तालिबानचा दावा – पंजशीर आता आमच्या ताब्यात
एक तालिबान कमांडर म्हणाला, “अल्लाहच्या कृपेने, संपूर्ण अफगाणिस्तानवर आमचे नियंत्रण आहे. आम्ही विद्रोह करणाऱ्यांना पराभूत केले आहे आणि पंजशीर आता आमच्या ताब्यात आहे. ” याआधीही तालिबान लढाऊ असे काही दावे करत आले आहेत, ज्याला अमरुल्ला सालेह यांनी फेटाळून लावले आहे. यावेळीही, सालेह यांनी तालिबानचा ताबा मिळवण्याचा दावा जोरदारपणे नाकारला.
सालेह म्हणाले – देशातून पळून गेलो नाही, निराधार अहवाल
दरम्यान, अमरुल्ला सालेह यांनी शुक्रवारी दावा केला की ते देश सोडून पळून गेले नाही आणि या अहवालांना निराधार असल्याचे म्हटले आहे. सालेह यांनी सांगितले की ते पंजशीर खोऱ्यात आहे आणि ते आपल्या कमांडर आणि राजकीय नेत्यांसह परिस्थिती हाताळत आहे. ते म्हणाले, “मी देश सोडून पळून गेल्याचे काही मीडिया रिपोर्ट प्रसारित केले जात आहेत. हे पूर्णपणे निराधार आहे. हा माझा आवाज आहे, मी पंजशीर खोऱ्यातून बोलत आहे, माझ्या तळावरून. मी माझ्या कमांडरशी बोलत आहे. अर्थात, ही एक कठीण परिस्थिती आहे. तालिबान, पाकिस्तानी, अल कायदा आणि इतर दहशतवादी गटांकडून आमच्यावर हल्ले होत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे