नवी दिल्ली, ६ जानेवारी २०२३ : दिल्लीतील कंझावाला येथे कारखाली आलेल्या अंजली सिंह या २० वर्षीय तरुणीला चालकाने १२ किलोमीटर फरपटत नेल्याची घटना नुकतीच घडली होती. या अपघातात अंजलीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली असून गाडी मालक आशुतोषला अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
आरोपींना वाचवण्याचा आशुतोषवर आरोप
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी १ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजून ३३ मिनिटांनी रोहिणीतील सेक्टर १ मध्ये पोहोचले होते. यावेळी आशुतोषही तिथे उपस्थित होता. आरोपींनी त्यापूर्वीच फोन करून आशुतोषला अपघाताबाबत माहिती दिली होती. त्यामुळे त्याने आरोपींना पळून जाण्यासाठी ऑटोची व्यवस्था करून दिली होती.
दरम्यान, या प्रकरणात एकूण सात आरोपींचा सहभाग असून, यापैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एकाचा शोध सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. याबरोबरच बलात्काराचे कोणतेही पुरावे नाहीत, असेही दिल्ली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.