राज्यातील काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता

मुंबई, दि. २८ मे २०२०: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. परंतु यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी हे प्रभावी पक्ष ठरले आहेत. एकंदरीत काँग्रेसचा प्रभाव या आघाडी सरकारमध्ये कमी दिसून आला आहे. त्यामुळेच आता राज्यातील काँग्रेस पक्षामध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेश अध्यक्षाची जबाबदारी देण्यात आली होती पण आता ती जबाबदारी काढून घेण्यात येणार आहे. ही जबाबदारी काढून ती सध्या विधानसभेचे अध्यक्ष असलेले काँग्रेसचे आक्रमक नेते नाना पटोले यांना दिली जाणार आहे. तर, पटोले यांच्या पदावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

राज्यामध्ये काँग्रेसकडे सर्व महत्वाचे खाती आहेत तरीसुद्धा काँग्रेस पक्षाचा आघाडी सरकारमध्ये प्रभावी ठसा दिसून आलेला नाही. महा आघाडी सरकार मध्ये काँग्रेसकडे महसूल, शालेय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम अशी अनेक महत्त्वाची खाती आहेत. मात्र, सरकारच्या निर्णयप्रक्रियेवर काँग्रेसची छाप दिसत नसल्याच्या तक्रारी पक्षातूनच येत आहेत. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील संघटनेच्या पातळीवरदेखील पक्षांमध्ये भक्कम बांधणी बघण्यास मिळालेली नाही.

एकंदरीत राज्या मधील काँग्रेस पक्षाची स्थिती पाहता हायकमांडने पक्षामध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील आणि ओबीसी समाजाचे असलेले पटोले हे लढवय्ये आहेत. सध्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांची चर्चा जोराने चालू आहे. भाजपला जशास तसं उत्तर देण्याची क्षमता त्यांच्याकडं आहे. त्यांच्या आक्रमकतेचा पक्षाला चांगला फायदा होऊ शकतो, असंही मानलं जातं. महत्वाचे म्हणजे सध्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्याकडं महसूलमंत्रिपदासह विधिमंडळ पक्षनेते पदाचीही जबाबदारी आहे. त्यांना प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्यास सरकारमध्ये लक्ष केंद्रित करता येईल व प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा देऊन पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करता येईल. त्यामुळे नाना पटोले यांचे नाव जास्त चर्चेत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा