यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन

मुंबई,२० एप्रिल २०२३: प्रसिद्ध चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांनी आज (२० एप्रिल) अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. गेल्या काही वर्षांत त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने लाखो मने जिंकली. दिग्गज यश चोप्रा यांनी बनवलेल्या अनेक चित्रपटांच्या संगीतात त्या सहभागी होत्या. पामेला यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा आहेत.

भारतीय पार्श्वगायिका असण्यासोबतच त्यांनी अनेक YRF(यशराज फिल्म) चित्रपटांमध्ये लेखक, ड्रेस डिझायनर आणि सह-निर्माता म्हणूनही काम केले आहे. सूत्रानुसार, पामेला गेल्या १५ दिवसांपासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि हळूहळू त्यांची तब्येत खराब होऊ लागली.

https://www.instagram.com/p/CrP3FLfse2_/?igshid=MjljNjAzYmU=

यशराज फिल्मच्या अधिकृत पेजवर त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या पोस्टद्वारे पामेला यांच्यावर मुंबईत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.यावर्षी पामेला चोप्रा वायआरएफवरील “द रोमँटिक्स” नावाच्या माहितीपटात दिसल्या होत्या. या माहितीपटामध्ये त्यांनी त्यांच्या नवऱ्याबरोबरचा प्रवास सांगितला.१९७० मध्ये पारंपारिक समारंभात पामेला आणि यश चोप्रा यांनी प्रेमाची कबुली देऊन एकत्र राहण्याची शपथ घेतली. या दोघांना आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा ही दोन मुले झाली.

पामेला चोप्रा यांची कारकीर्द पाहायला गेलं तर त्यांनी अनेक चित्रपटांना आवाज दिला आहे, ज्यात कभी कभी (१९७६) ते मुझसे दोस्ती करोगे! (२००२). याशिवाय त्यांनी १९९३ मध्ये आलेला ‘आयना’ हा चित्रपट स्वतंत्रपणे तयार केला होता. पामेला यांनी त्यांच्या पतीच्या १९९७ च्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाची पटकथा देखील लिहिली होती ज्यामध्ये त्यांचे पती यश चोप्रा, मुलगा आदित्य चोप्रा आणि व्यावसायिक लेखिका तनुजा चंद्रा यांचाही समावेश होता. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला आदरांजली!

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा