संभाजी भिडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी

अमरावती, ३१ जुलै २०२३ : काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ट्विटरवरून ही धमकी देण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्याबद्दल असेच बोलत राहाल, तर तुमचा दाभोळकर करू, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने यशोमती ठाकूर यांना दिला आहे.

शिवप्रतिष्ठान संवस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याला काँग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही याविरोधात आक्रमक भूमिका घेतली, तेंव्हा त्यांच्या कराड येथील निवासस्थानी फोन करून धमकी देण्यात आली. आमदार यशोमती ठाकूर या देखील आक्रमकपणे या मुद्द्यावर बोलताना दिसल्या. त्यांनी अमरावतीत रस्त्यावर उतरत आंदोलनही केले. त्याच पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

यशोमती ठाकुर यांनी एक ट्विट केले होते, आपल्या तत्वांशी, विचारांशी तडजोड करू नका. लक्षात ठेवा इतिहास गद्दारांचा नाही तर लढणाऱ्यांचा लिहिला जातो. आज इतिहासाने आपल्यावर एक जबाबदारी सोपवली आहे.आज जर आपण चुकलो तर हा देश आपल्याला माफ करणार नाही. देशाची लोकशाही टिकवायची असेल तर द्वेष पेरणाऱ्यांना थारा देऊ नका. जय हिंद!, हे ट्विट यशोमती ठाकूर यांनी केले होते. त्या ट्विटवर केलेल्या कमेंटमधून, दाभोळकर असाच ओरडत होता एक दिवस टराटरा फाडून जन्नत मध्ये पाठवला. धारकरी कोथळा बाहेर काढतात, हे लक्षात असू द्या, हरामखोर बाई कोण आहे स्पष्ट करा, असे म्हणत यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

तुम्हाला काय करायचे ते करा. मला मारायचे असेल तर मारा पण संभाजी भिडे यांच्या वक्तव्याला मी विरोध करत राहणार. पण माझ्या जीवाला काही बरे वाईट झाले तर त्याला गृहखाते जबाबदार असेल, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर आता यशोमती ठाकूर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. धमकीनंतर ठाकूर यांच्याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यशोमती ठाकूर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा