पुणे : (दि. २३ एप्रिल २०२०)
पुणे जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून ते गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत ५३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ९३४ वर गेली आहे. शहरातील हॉटस्पॉट ठरत असलेल्या भवानी पेठेत आतापर्यंत १७१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या भीतीत अजून भर पडत चालली आहे.
पुणे शहरात २२ एप्रिलपर्यंत ७८३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. कोथरुड व बावधन परिसरात सर्वात कमी म्हणजे एक रुग्ण आहे. मात्र, कसबा विश्रामबाग वाड्यापाठोपाठ ढोले पाटील रोड भागातील रुग्णांची संख्या शंभरीपार गेली आहे. येरवडा-धानोरी आणि शिवाजीनगर-घोले रोड भागात ७५ हुन अधिक रुग्ण आढळले आहेत.
एका दिवसात, शिवाजीनगर-घोलेरोड येथे २८, येरवडा-धानोरी भागात १४, ढोले पाटील रोड येथे १३ तर कसबा-विश्रामबाग वाडा परिसरात ९ नवे रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
परंतु, औंध-बाणेर आणि कोथरुड-बावधन भागात गेल्या अनेक दिवसात नवा रुग्ण न सापडल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.