एअरो इंडियाै-२०२१ आशियातील सर्वात मोठ्या एअरो शो’ साठी जगाला निमंत्रण

नवी दिल्ली, ८ ऑक्टोंबर २०२०: संरक्षण मंत्रालयांतर्गत, असलेल्या संरक्षण उत्पादन विभागानं एअरो इंडिया-२०२१ संदर्भातील राजदूतांची आभासी परिषद संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. परिषदेसाठी राजदूत, उच्चायुक्त प्रमुख आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित ७५ देशातील २०० पेक्षा अधिक निमंत्रितांचा समावेश होता. १३ वा द्वैवार्षिक एअरो शो बेंगळुरु येथे ३-७ फेब्रुवारी, २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात एकाच छताखाली भारताच्या हवाई क्षेत्रातील आणि संरक्षण उत्पादनातील क्षमतांचं प्रदर्शन करण्यात येईल, याविषयी परदेशी दुतावासांच्या अधिकाऱ्यांना एअरो इंडिया-२१ ची तपशीलवार माहिती देण्यात आली.

परिषदेला संबोधित करताना संरक्षणमंत्री म्हणाले, एअरो इंडिया-२१ भारताच्या संरक्षण आणि हवाई क्षेत्रात पहिल्या पाच देशांमध्ये समावेश होण्याच्या दूरदृष्टीशी सुसंसगत आहे. राजनाथ सिंग म्हणाले, आत्मनिर्भर भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे आणि यासाठी संरक्षण मंत्रालयानं संरक्षण क्षेत्रात ७४% थेट परकीय गुंतवणुकीला मंजूरी, संरक्षण खरेदी प्रक्रिया- २०२०, आणि व्यवसाय-सुलभतेसाठी सह-उत्पादन तसेच संरक्षण उत्पादन आणि निर्यात चालना धोरण २०२० (डीपीईपीपी २०२०) चा मसुदा तयार केला आहे.

राजनाथ सिंग पुढं म्हणाले, भारताचे एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्र परिपक्व झाले आहे आणि भारतातील उत्पादन उद्योग आणि परदेशात निर्यात करण्यासाठी भारतात उत्पादित संरक्षण उपकरणे स्थापन करण्यासाठी मित्र देशांशी परस्पर लाभदायक भागीदारी शोधत आहे. एअरो इंडिया-२१ मधून भारताची २५ अब्ज अमेरिकी डॉलर्स उलाढालीचे उद्दिष्ट साध्य करण्याविषयी सरकारचा हेतू दिसून येईल, ज्यात २०२५ पर्यंत ५ अब्ज अमेरिकी डॉलर्स एअरोस्पेस आणि संरक्षण उत्पादन आणि सेवा निर्यातीचं उद्दिष्ट आहे.

जागतिक प्रतिनिधींना एअरो इंडिया-२१ हा व्यवसायभिमुख कार्यक्रम असेल आणि कोविड- १९ नियमांचं पूर्ण पालन करेल, अशी माहिती देण्यात आलीय. संरक्षण मंत्रालयानं ११ सप्टेंबर २०२० रोजी कार्यक्रमाचे संकेतस्थळ सुरू केल्यापासून या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे आणि एअरो शोसाठी ९०% पेक्षा अधिक जागा आरक्षित झाली आहे. आशियातील सर्वात मोठ्या एअरोशो दरम्यान विविध व्यावसायिक कार्यक्रम आणि सेमिनारचे नियोजन आहे आणि ५०० पेक्षा अधिक प्रदर्शकांच्या उपस्थितीची शक्यता आहे.

राजनाथ सिंग यांनी एअरो इंडिया- २०२१ चा अधिकृत उद्घाटन चित्रफितीचे यावेळी प्रकाशन केले. “अब्जावधी संधीचा मार्ग” ही यावर्षीच्या एअरो स्पेसची संकल्पना आहे. संरक्षण मंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की एअरो इंडिया -२१ कोविडनंतरच्या जागतिक परिस्थितीत भारताची पुढाकार घेण्याची क्षमता दर्शवेल.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येदीयुरप्पा, संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, संरक्षण उत्पादन सचिव राज कुमार यांनीही परिषदेला संबोधित केले. सर्वांनीच आत्मनिर्भर भारताचा एक आधारस्तंभ म्हणून संरक्षण मंत्रालयाला चालना देण्याचा संकल्प मांडला आणि परदेशी प्रतिनिधींना एअरो इंडिया-२१ साठी आमंत्रित केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा