‘वाघ संवर्धन स्थलांतरण मोहीम’ ताडोबा टू नवेगाव-नागझिरा अभयारण्य दोन वाघीणी झाल्या ट्रान्सलोकेट.

नागपूर २० मे २०२३ : महाराष्ट्रातील नवेगाव नागझिरा अभयारण्यात वन्यजीवांचा समतोल राखण्यासाठी, वाघांचे हस्तांतरण करण्याचा प्रयोग राज्यात प्रथमच केला जातोय. भंडारा जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील राज्याचा पहिला मोठा संवर्धन ट्रान्सलोकेशन प्रयोग अंतिम टप्प्यात असून ताडोब्यातील ब्रह्मपुरी येथून आणलेल्या २ वाघिणींना नागझिरा कोअर झोनमध्ये सुरक्षितपणे पोहचविण्यात आले आहे.

नवेगाव नागझिरा हे अत्यंत घनदाट आणि आकर्षक जंगल असून भंडारा व गोंदिया अशा दोन जिल्ह्यात ते पसरले आहे. या अभयारण्यात नर वाघांची संख्या जास्त म्हणजेच ९ आहे. नरांच्या तुलनेत कमी मादया म्हणजेच ३ वाघिणी येथे आहेत. वाघीणींची संख्या वाढवुन तेथील वाघ वाघीणींचे गुणोत्तर सुधारण्यास मदत करणे असे या मोहिमेचे स्वरूप आहे. तसेच नागझिरा अभयारण्याच्या क्षेत्रात वाघांची संख्या कमी आहे,ती वाढण्यास या मोहिमेमुळे चालना मिळेल.

नागझिरामध्ये एकूण ४ मादी वाघिणींना सोडण्याचा प्रस्ताव होता. गेल्या काही वर्षांत पहिल्या टप्प्यात सोडण्यात येणाऱ्या २ वाघिणीना पकडण्यात यश न आल्याने हा महत्त्वाचा प्रकल्प बराच काळ खोळंबला होता. परंतु आता रॅपिड रेस्क्यू टिमने या मोहिमेअंतर्गत ताडोबातून दोन वाघिणी पकडल्या आहेत. गेल्या रविवारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोळसा रेंजमधून वाघिणीच्या बछड्याला पकडण्यात आले. तर मंगळवारी सकाळी गडचिरोलीच्या आरमोरी रेंजमधून अडीच वर्षांची टी-४ वाघीण पकडण्यात आली, या वाघीणींना बुधवारी सकाळी नवेगाव नागझिराच्या पिटेझरी गेट येथून नागझिरा येथे आणण्यात आल होतेे.

जय-वीरू नावाच्या वाघांच्या स्थलांतरामुळे नागझिरा अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या गेल्या १० वर्षात सातत्याने घटत आहे. अलीकडेच कोका रेंजमध्ये विषबाधेमुळे टी-१३ वाघाचाही मृत्यू झाला होता. त्यामुळे ही मोहीम लवकर पूर्ण करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेतला होता. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ, राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण, नवी दिल्लीचे अधिकारी आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी व डॉक्टर यांनी सहमती दिल्यानंतर आज शनिवारी २० मे रोजी या दोन वाघीणींना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नवेगाव नागझिरा अभयारण्यातील त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलेे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा