प्रोस्टेट ग्रंथी पुरुषांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. साधारणत: चाळीशी-पन्नाशीनंतर प्रोस्टेट ग्रंथींचा आकार वाढू लागतो. त्याची परिणती प्रोस्टेट ग्रंथींच्या कॅन्सरमध्ये होते. या विकाराला बऱ्याच बाबी कारणीभूत ठरतात. प्रोस्टेट कॅन्सरची वाढ मंद गतीने होत असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणं लक्षात येत नाहीत.
चुकीची जीवनशैली आणि आहाराच्या चुकीच्या सवयी प्रोस्टेट कॅन्सरला कारणीभूत ठरतात. जीवनशैलीत काही बदल करून प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करता येऊ शकतो.
सर्वसाधारणपणे पन्नाशीनंतर पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो. पण सध्याच्या धकाधकीच्या काळात कमी वयाच्या पुरुषांनाही हा विकार जडू शकतो. प्रोस्टेट कॅन्सरच्या वाढीच्या कारणांची ही चर्चा.
वाढतं वय हे प्रोस्टेट कॅन्सरचं सर्वात महत्त्वाचं कारण ठरतं. पन्नाशी ओलांडलेल्या पुरुषांमध्ये हा कॅन्सर झपाट्याने पसरतो. त्यामुळे विशिष्ट वयानंतर पुरुषांनी प्रोस्टेट कॅन्सरची तपासणी करून घ्यायला हवी. जनुकीय कारणांमुळेही हा विकार होऊ शकतो. कुटुंबात प्रोस्टेट कॅन्सरचा इतिहास असेल तर पुरुषांनी विशेष काळजी घ्यायला हवी.
आहाराच्या चुकीच्या सवयीही प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीला कारणीभूत ठरत आहेत. जंक फूड, लाल मांस, मेदयुक्त दुग्धजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर होऊ शकतो. स्थूलत्व हे अनेक विकारांचं मूळ असू शकतं. स्थूलपणामुळे प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
काही संशोधनंही या शक्यतेकडे अंगुलीनिर्देश करतात. धूम्रपानाचे बरेच धोके आहेत. तंबाखूमुळे फुफ्फुस तसंच तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो. याबाबतची सूचनाही तंबाखूच्या पाकिटावर लिहिलेली असते.
यासोबतच धूम्रपानामुळेही प्रोस्टेट कॅन्सरला आमंत्रण मिळू शकतं. वंध्यत्वाची समस्या असणाऱ्या पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो. मात्र, प्राथमिक अवस्थेत निदान झाल्यास औषधोपचारांनी हा त्रास बरा होऊ शकतो.