अहमदनगर दुर्घटने प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर

अहमदनगर, 7 नोव्हेंबर 2021: अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
दरम्यान या दुर्दैवी घटनेत मृत्यु पावलेल्याच्या नातेवाईकांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात येत असून चौकशीदरम्यान रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजची मदत घेणार असल्याने सत्य बाहेर येईल असे पालकमंत्री म्हणाले.
या समितीमध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे. ज्यांनी हलगर्जीपणा केला असेल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई होईल. दुर्घटनेच्यावेळी रुग्णालयात अनुपस्थित असणाऱ्या संबधितांवरही कारवाई करण्यात येईल. ऱ्हदय पिळवटून टाकणारी अतिशय दुर्देवी घटना असल्याचे ते म्हणाले. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. गेल्या काही काळात स्वत: रुग्णालयाला तीन चार वेळा भेट दिली होती. आरोग्य सेवेसाठी पुरेसे अनुदान शासनाकडून देण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
 फायर ऑडिटरांच्या सूचनांची दखल घेण्यात येईल तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात येईल असे ते म्हणाले. या घटनेची लवकरात लवकर चौकशी करून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
आगेतील, जखमींवर योग्य उपचार करण्यात येतील आणि त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरिक्षक दीपक पांडे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा