उच्च शिक्षण संचालक डॉ.देवळाणकरांची हकालपट्टी करा : अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाची मागणी

जळगाव १२ डिसेंबर २०२३ : राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेश देवळाणकर यांच्यात वैचारिक द्वेष भरलेला आहे. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केली आहे.

एम.फिल., नेट- सेट नवीन शैक्षणिक धोरण संदर्भात अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ वेळोवेळी विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. नुकतेच २३ नोव्हेंबर रोजी देवळाणकर यांनी एम.फील संदर्भात एक पत्र सर्व सहसंचालकांना पाठविले. त्यात त्यांनी आवर्जून एका विशिष्ट संघटनेचा उल्लेख केला आहे. तसेच राज्याचे उपसचिव बाविस्कर यांना देखील विशिष्ट संघटनेचा उल्लेख करून पत्र काढलेले आहे.

एम.फील संदर्भात अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ म्हणून आम्ही उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली आहेत. संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांच्या सोबत मंत्री महोदयासमोर चर्चा झालेली आहे. राज्यपाल व केंद्रीय शिक्षण मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन प्रत्यक्ष निवेदने सादर केलेली आहेत, त्या अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोगाने देखील आमच्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत पत्र काढलेले आहे. पण या सर्वांकडे दुर्लक्ष करीत केवळ एखाद्या संघटनेला श्रेय देण्यासाठी त्यांचे नावाचा उल्लेख करीत पत्र काढणे हा केवळ वैचारिक व्देष आहे.

त्यात संघटनेला नवीन शैक्षणिक धोरण या संदर्भातील बैठकीसमोर सुनावणी देण्यात आलीय. मंत्री महोदयांसोबत झालेल्या बैठकीत मंत्री महोदयांनी आमच्यासमोर संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांना अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाला देखील सुकाणू समिती बरोबर बैठक द्यावी, असे आदेश व आमचे पत्र दिले. या गोष्टीला महिना झाला परंतु अद्याप देवळणाकर यांना आमच्या संघटनेला पत्र द्यायला वेळ मिळाला नाही. हे सर्व जाणीवपूर्वक होत आहे.

मंत्री महोदयांचे आदेश ढाब्यावर बसवून वैचारिक व्देष करणाऱ्या आणि विशिष्ट संघटनेला साह्य मिळावे म्हणून संचालक धडपड करत आहेत. त्यामुळे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांची हकालपट्टी करावी, असा ठराव महाराष्ट्र प्रांत कार्यकारणीच्या नांदेड येथील बैठकीमध्ये घेण्यात आला.

या बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष व एन मुक्ता अध्यक्ष प्रा.नितीन बारी, सचिव प्रा.डॉ. पवन पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवाजी पाटील, नंदुरबार जिल्हा सचिव प्रा.भगवान चौधरी व प्रा. व्ही. डी. पाटील उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : डॉ.पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा