वर्धा येथील अवलिया प्रा. सचिन सावरकर ‘पुस्तक दोस्ती अभियाना’द्वारे विद्यार्थ्यांत रुजविताहेत वाचनाची आवड

वर्धा, २१ डिसेंबर २०२२ : जीवनामध्ये कोणती गोष्ट एखाद्या व्यक्तीला सकारात्मक कार्य करायला प्रेरित करेल, हे सांगता येत नाही. अध्यापनासाठी वर्गात गेलेल्या एका प्राध्यापकाला आपल्या मातृभाषेविषयी विद्यार्थ्यांची असलेली दयनीय अवस्था पाहून राहावलं नाही. यावर काहीतरी उपाय केला पाहिजे, या विचारातून विद्यार्थ्यांची वाचनाची अडचण सोडविण्यासाठी ‘पुस्तक दोस्ती वाचन चळवळ’ सुरू झाली. ‘पुस्तक दोस्ती वाचन चळवळ’ अर्थात ‘पुस्तक दोस्ती अभियान’ सुरू करणाऱ्या या वाचन चळवळीचे प्रणेते आहेत वर्धा येथील अवलिया प्राध्यापक सचिन सावरकर…

इंटरनेटद्वारे विद्यार्थ्यांना एका क्लिकवर पाहिजे ती माहिती मिळते; पण ज्ञान मात्र मिळत नाही. मात्र, हे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी व त्यांच्यामध्ये वाचनाची आवड रुजविण्यासाठी देवळी येथील प्रा. सचिन सावरकर हे गेल्या १५ वर्षांपासून ‘पुस्तक दोस्ती अभियान’ राबवीत आहेत. या नावीन्यपूर्ण अभियानाच्या माध्यमातून प्रा. सचिन सावरकर शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीचे धडे रुजवीत आहेत.

नवीन पिढीने वाचनाकडे पाठ फिरविली आहे, हे सर्वांना माहीत आहे. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार झाल्यास आयुष्याची इमारत या भक्कम पायावर उभी राहते. ‘पुस्तक दोस्ती अभियान’तर्फे दरवर्षी दीपावली आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये गावागावांत ‘पुस्तक पेढी योजना’ राबविण्यात येते. या योजनेच्या माध्यमातून शास्त्रज्ञ, स्पर्धा परीक्षा व महापुरुषांच्या चरित्राची पुस्तके शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोचविली जातात.

विद्यार्थ्यांनी माहितीपेक्षा वाचनातून ज्ञानार्जनावर भर द्यावा. जेणेकरून आपल्या जीवनाला आकार मिळून आपण कुटुंबासाठी व समाजासाठी काही करू शकू, ही भावना निर्माण होणे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात ग्रंथमित्राची निवड करून पुस्तके शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोचविली जातात.

आजच्या काळात मुलांविषयी प्रत्येक पालकाच्या चेहऱ्यावर कायम चिंतेचे जाळे आपल्याला दिसून येते. एक सजग पालक; तसेच संवेदनशील शिक्षक म्हणून मी काय करू शकतो, यावर विचार होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात पुस्तक वाचनातून बुद्धीला चालना आणि समाजाला समजून घेणारी पिढी निर्माण होऊ शकते, या अनुभवातून विदर्भात
‘पुस्तक दोस्ती अभियाना’च्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तक कसे येईल, यासाठी धडपड करीत आहे. त्यासाठी नियमित विविध कार्यक्रमांचे आयोजन करतो. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यात ‘पुस्तक दोस्ती अभियान’ सातत्याने विविध उपक्रम राबवीत असतात.

समाजमनासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या वाचन चळवळीसाठी प्रा. सचिन सावरकर यांना विवेक महाजन, शैलेश जाधव, चेतन तेलरांधे, सुनील कुराडे, निशांत नडे, दिगंबर साखरे, विजय बाबर, विनोद सागवेकर, आशिष देवतारे, फरीन शेख, अमृता सोईतकर, वृषाली उरकुडे, शीतल सावकर ही संवेदनशील तरुण मंडळी सहकार्य करीत आहेत.

दहा हजारांवर पुस्तके वाटपाचा संकल्प
दृश्य मनोरंजन अर्थातच मोबाईल, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंटरनेटच्या सततच्या वापरामुळे नवीन पिढीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. याची झळ सर्वजण सोसत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना व आजच्या युवकांना इंटरनेट आणि सोशल मीडियापासून परावृत्त करण्यासाठी पालक आणि शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. याअनुषंगाने पालक, शिक्षक व समाजातील सूज्ञ घटकांनी ‘पुस्तक दोस्ती अभियाना’ला सहकार्य करणे अपेक्षित आहे. उन्हाळ्याच्या सुटीत राबविण्यात येत असलेल्या या योजनेतून जिल्ह्याच्या शहरी भागासोबतच ग्रामीण भागात दहा हजारांवर पुस्तके वाटप करण्याचा संकल्प ‘पुस्तक दोस्ती अभियान’चे प्रणेते प्रा. सचिन सावरकर यांनी व्यक्त केलेला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा