बीसीसीआय करणार बम्पर कमाई, दरवर्षी आयसीसी कडून मिळणार १,८८७ कोटी रुपये

मुंबई ११ मे २०२३:आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या वित्त मॉडेलनुसार, आयसीसीला दरवर्षी जितकी कमाई होईल त्यातील ३८.५ टक्के वाटा बीसीसीआयला मिळेल. या नव्या वित्तीय माॅडेलमुळे आयसीसीला दरवर्षी जवळपास ४,९२२ कोटी रुपयांहून अधिकची कमाई होईल, असा अंदाज आहे. याच्या ३८.५ टक्के म्हणजे १,८८७ कोटी रुपये बीसीसीआयला मिळतील.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नवे वित्त मॉडेल सादर केले आहे. या मॉडेलमध्ये जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची (बीसीसीआय) कमाई आणखी वाढणार आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंड क्रिकेट बोर्ड आहे. त्यांची वार्षिक कमाई जवळपास ३३९ कोटी रुपये होईल. तिसऱ्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलियाची कमाई जवळपास ३०० कोटी रुपये होईल. बीसीसीआयच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ७ पट कमी म्हणजे जवळपास २८३ कोटी रुपयांचीच कमाई होईल.

जागतिक स्पर्धांमधील कामगिरीच्या आधारावर अायसीसीच्या वित्तीय माॅडेलमध्ये हिस्सेदारी ठरवली जाते. या नव्या वित्तीय मॉडेलवर आयसीसी सर्व क्रिकेट बोर्डाकडून अभिप्राय मागवणार आहे. अभिप्राय देण्याची अंतिम मुदत जूनपर्यंत आहे. जूनमध्येच दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनमधील आयसीसीच्या वार्षिक बैठकीत या नव्या वित्त मॉडेलला मंजुरी दिली जाईल.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा