जर तुम्ही 30 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलं असेल तर आता इतका वाढेल EMI

पुणे, 9 जून 2022: तब्बल 4 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा व्याजदरवाढीचं युग परत आलंय. अनेक वर्षांच्या उच्चांकावर पोहोचलेल्या महागाईने रिझर्व्ह बँकेला (RBI) रेपो दरात वाढ करणं भाग पडलं आहे. यानंतर मे आणि जूनमध्ये रेपो दरात दोनदा वाढ करण्यात आलीय. आता रेपो रेट 0.90 टक्क्यांनी वाढून 4.90 टक्के झालाय. रेपो दर वाढवल्याचा परिणाम बँकांवर होऊ लागला असून त्यांनी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केलीय. शेवटी, याचा फटका गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्जाचे हप्ते भरणाऱ्यांनाच बसेल.

गेल्या महिन्यापासून महाग होऊ लागली कर्जे

कोरोना महामारीनंतर, रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रेपो दरात सातत्याने कपात केली. रेपो दर खाली येऊ लागल्यावर बँकांनीही व्याजदर कमी केलं. अशाप्रकारे, व्याजदर अनेक दशकांतील नीचांकी पातळीवर आलं. रेपो दर जवळपास दोन वर्षे 4 टक्क्यांवर स्थिर राहिला आणि त्यामुळे लोकांना दोन वर्षे स्वस्तात कर्जे मिळत राहिली. मात्र, महागाईने स्वस्त कर्जाचे युग संपवलं. मे महिन्यात पहिल्यांदाच रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.40 टक्क्यांनी वाढवून 4.40 टक्के केला. यानंतर जूनच्या बैठकीनंतर बुधवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली. येत्या काही महिन्यांत रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

गृहकर्ज EMI खूप वाढेल

आतापर्यंतची दरवाढ पाहता रेपो रेट 0.95 टक्क्यांनी वाढलाय. बँकाही त्याच प्रमाणात कर्जाचे व्याजदर वाढवत आहेत. आता समजा तुम्ही 30 लाख रुपयांचं गृहकर्ज 20 वर्षांसाठी घेतले आहे आणि व्याज दर 7 टक्के आहे. जर तुमच्या बँकेनेही रेपो रेटच्या धर्तीवर व्याज वाढवले, तर तुमचा EMI 23,259 रुपयांवरून 24,907 रुपये होईल. म्हणजेच तुमचा ईएमआय 1,648 रुपयांनी वाढेल. म्हणजेच, कर्जाच्या प्रत्येक एक लाख रुपयांमागे ईएमआय 55 रुपयांनी वाढेल.

कार लोन, पर्सनल लोन वर इतका प्रभाव

त्याचप्रमाणे जर आपण 7 वर्षांच्या कालावधीसह 8 लाख रुपयांच्या वाहन कर्जाबद्दल बोललो, तर इथेही EMI वर परिणाम होणार आहे. सध्या कार कर्जावरील सरासरी व्याज दर सुमारे 10 टक्के आहे. रेपो दराच्या धर्तीवर ते 10.9 टक्क्यांपर्यंत वाढेल. असं झाल्यास, सध्या 13,281 रुपये प्रति महिना असा EMI वाढून 13,656 रुपये होईल. म्हणजेच ईएमआय दरमहा 375 रुपयांनी वाढेल. वैयक्तिक कर्जाचं उदाहरण घेतल्यास, 14 टक्के व्याज दराने 5 वर्षांसाठी 5 लाख रुपयांच्या बाबतीत EMI 11,634 रुपयांवरून 11,869 रुपये होईल. म्हणजेच, या प्रकरणात मासिक ईएमआय 235 रुपयांनी वाढेल.

अशा प्रकारे तुम्ही EMI कमी करू शकता

वाढलेल्या EMI चे ओझं कमी करण्याचा एक मार्ग म्हणजे कर्जाचा कालावधी वाढवणे. सर्वसाधारणपणे, बँकांना देखील ग्राहकाने कर्जाची मुदत वाढवायची असते. विशेषत: गृहकर्जाच्या बाबतीत, जुनी मुदत कमी असल्यास बँका त्याला वाढवण्याचा पर्याय देतात. तुमचं गृहकर्ज 15 वर्षे किंवा 20 वर्षांसाठी असेल, तर बँका ते अनुक्रमे 20 आणि 25 वर्षांसाठी वाढवतात. याचा फायदा असा आहे की मासिक ईएमआय वाढत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा