दिवाळीत प्रवाशांच्या खिशाला कात्री, एसटी कडून दहा टक्के भाडेवाढ तर खाजगी ट्रॅव्हल कडून मनमानी भाडे वसुली

मुंबई, २० ऑक्टोबर २०२२ : सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना प्रवासासाठी खिशाला कात्री लागणार आहे. दिवाळीच्या तोंडावर एसटीकडून १० % भाडेवाढ करण्यात आली आहे. तर खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांकडून मात्र प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारले जात आहे. एसटीची भाडेवाढ आज २० ऑक्टोबर पासून लागू झाली आहे. तर खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांकडून मागील काही दिवसांपासून प्रवाशांची लूट चालवली आहे.

दिवाळी निमित्त शहरातून बाहेरगावी जाणाऱ्या लाेकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे ६० % बुकिंग अगोदरच झालेले आहे. अचानक बाहेर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. सणासुदीचा काळ वगळता इतर वेळेस पुरेसे प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी भाडेवाढ केली जाते, असे ट्रॅव्हल्स चालकांकडून सांगण्यात आले.

सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन कालबाह्य झालेल्या, परिवहन विभागाची परवानगी न घेता काही ट्रॅव्हल्स धावत आहेत. प्रवाशांचा विमा उतरवलेला नाही. मोडकळीस आलेल्या बस धोकादायक आहेत. बसच्या सुरक्षेची खात्री करूनच प्रवाशांनी बुकिंग करावे, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, अहमदाबाद आदी शहरांत जाण्यासाठी आगाऊ बुकिंग करावे लागत आहे. परिवहन विभागाच्या नियम आणि अटी नुसार प्रवाशांना तक्रार करण्यासाठी पोर्टल नंबर जाहीर करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा