म्हसळा, ९ फेब्रुवारी २०२४ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गेली १८ वर्ष काम करणारे म्हसळा शहर प्रमुख अनिकेत पानसरे यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने म्हसळा शहरात राजकीय खळबळ सुरू झाली आहे. म्हसळा शहरातील कट्टर तसेच कडवट शिवसैनिक अनिकेत पानसरे हे सद्यस्थितीत उबाटा गटाकडून नगरसेवक देखील आहेत. मात्र त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल नावगणे यांच्याकडे हा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ सुरू आहे.
नुकत्याच उद्धव ठाकरे यांचा म्हसळा येथील जनसंवाद मेळावा पार पडला या प्रसंगी अनिकेत पानसरे हे मुख्य स्टेजवर होते मात्र अवघ्या काही दिवसातच त्यांनी त्यांच्या शहरप्रमुख पदाचा राजीनामा देण्याचं नेमकं कारण गुलदस्त्यात आहे. अनिकेत पानसरे यांची शिवसेनेशी घट्ट रुणानुबंद असले तरी राजकीय चित्र पाहता म्हसल्यात नाराजीचे नाट्य सुरूच आहे यामुळे पानसरे यांचा इतर पक्षात जाण्याचा डाव तर नाही ना अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – गणेश म्हाप्रळकर