शिंपी हा छोटासा, सर्वत्र आढळणारा गोंडस असा पक्षी आहे. शिंपी पक्षी चिमणीपेक्षा लहान आहे. मराठीत शिंपी तर हिंदीत तो दर्जी या नावाने ओळखला जातो. घरटे बनवताना तो आपल्या चोचीने सुई धाग्याप्रमाणे पाने विणतो, यामुळे याला शिंपी किंवा टेलर बर्ड म्हणतात. भारत, श्रीलंका व म्यानमार येथे हा आढळतो. भारतात तो सगळीकडे वास्तव्यास आहे. हिमालयात दीड हजार मीटर उंचीपर्यंत आणि दक्षिणेकडील डोंगराळ प्रदेशात बाराशे मीटर उंचीपर्यंत तो आढळतो. झुडपांच्या जंगलात, कुंपणांच्या झाडात, घराभोवतालच्या बागेत, वेलींमध्ये तो नेहमी दिसतो. दाट जंगले व रखरखीत प्रदेश येथे मात्र तो सहसा आढळत नाही.
शिंपी म्हणजेच टेलर बर्ड हा ‘सिल्व्हिइडी’ पक्षिकुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ऑर्थोटोमस स्युटोरियस आहे. याच्या शरीराच्या वरच्या बाजूचा रंग पिवळसर हिरवा, खालची बाजू पांढरट, कपाळ व माथा तांबूस विटकरी, पंख व शेपटी तपकिरी, शेपटीची मधली पिसे लांब व टोकदार असून शेपटी नेहमी उभारलेली असते. चोच लांब, अणकुचीदार, काळपट डोळे तर पाय तांबूस पिवळे असतात. प्रजोत्पादनाच्या काळात नराच्या शेपटीतील मधली लांब पिसे जास्त लांब होतात.
शिंपी पक्षी अतिशय चंचल आहे. एका झुडपातून दुसऱ्या झुडपात किंवा जमिनीवर टुणटुण उड्या मारीत सारखा फिरत असतो, बऱ्याचदा घराच्या व्हरांड्यातही येतो. तो सर्व प्रकारचे लहान किडे, त्यांची अंडी, सुरवंट, अळ्या खातो. शेवरी व इतर झाडांच्या फुलांतील मधुरस तो शोषून घेतो. झुडपांमधून फिरत असताना तो, टु..विट टु..विट किंवा पि..ट् पिट् असा आवाज काढतो.
टेलर बर्डचे घरटे झुडपांमध्ये किंवा वेलींवर असते. पाने शिवून ते तयार केलेले असते. पाने शिवण्यासाठी तो चोचीचा सुईप्रमाणे आणि कोळ्याच्या जाळ्यांचा किंवा वनस्पतीच्या तंतूचा दोऱ्याप्रमाणे उपयोग करतो. एक किंवा दोन पाने शिवून तो त्याची आधी पुंगळी बनवितो. ती खालच्या बाजूने शिवून बंद करतो. या पिशवीत कापूस किंवा इतर मऊ पदार्थ घालून तो घरटे तयार करतो. वड, पिंपळ यांच्या पानांपासून तो घरटे तयार करतो. तो पक्ष्यांमधील अतिशय कुशल कलाकार आहे. अंड्याचे व त्यावर बसणाऱ्या पक्ष्याचे वजन सहन करण्याइतके घरटे मजबूत विणण्याची तो काळजी घेतो. नर व मादी दोघे मिळून घरटे तयार करतात. याच्या प्रजोत्पादनाचा काळ एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत असतो. तांबूस अथवा निळसर पांढऱ्या रंगाची ३ ते ४ अंडी मादी घालते. त्यांच्यावर तांबूस तपकिरी ठिपके असतात.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.