वन्यप्राणी- गवा (Indian bison)

‘गवा’ म्हणजे डौलदार, पिळदार, भारदस्त असा नजरेत भरणारा प्राणी. गवा हा भारतातील खूरवाल्या प्राण्यांपैकी सर्वांत मोठा आणि वजनदार प्राणी आहे. त्याची शरीरयष्टी भरदार असते. पूर्ण वाढलेल्या नर गव्याची उंची सहा फुटापर्यंत तर लांबी दहा फुटापर्यंत असते. नराच्या धडकी भरवणाऱ्या शिंगांचा विस्तार डोक्याच्या मुळापासून अडीच ते तीन फूट तर कान आकाराने मोठे असतात. नर गव्याचे वजन एका टना पर्य़ंत भरते. मादी ही नरापेक्षा लहान असते. गव्याच्या खांद्यावर एक मांसल उंचवटा म्हणजे वशिंड असून ते पाठीच्या मध्यापर्यंत गेलेले असते. दणकट बांध्यामुळे नर गवा अत्यंत ऐटबाज दिसतो.

गवा उष्णकटिबंधातील प्राणी आहे. हा थायलंड, मलेशिया, लाओस, व्हिएतनाम, नेपाळ, भूतान आणि भारत या देशांतील दाट वनांत आढळतो. सस्तनी वर्गाच्या समखुरी गणाच्या गोकुलातील गवा हा एक प्राणी. हिंदी भाषेत याला ‘गौर’ हे नाव आहे. भारतीय जातीच्या गव्याचे शास्त्रीय नाव ‘बॉस गॉरस’ असे आहे. जगभरातील एकूण गव्यांची संख्या पाहता ८०% गवे भारतात आढळतात. भारतामध्ये डोंगराळ भागातील अरण्यांत आणि हिमालयाच्या पायथ्याच्या टेकड्यांत गवे आढळतात. गव्याचा आयुःकाल ३०-४० वर्षे असतो. गवा आणि हत्ती यांचे सहचर्य पुष्कळदा आढळून येते, हे दोन्ही प्राणी एके ठिकाणी चरताना दिसतात. गवा आणि गाय यांच्या संकरातून जन्मणार्‍या प्राण्याला ‘मिथुन’ म्हणतात. ईशान्य भारतात असे मिथुन खूप आढळतात.

गवाचे मुख्य खाद्य गवत, पण ते पानेही खातात. कारवीची पाने आवडीने खातात. ते सकाळी आणि संध्याकाळी चरण्याकरिता बाहेर पडतात. दुपारी उन्हाच्या वेळी एकांतस्थळी सावलीमध्ये ते रवंथ करीत पडून राहतात. गवे क्षारयुक्त जमीन असलेल्या ठिकाणी अधूनमधून जाऊन ती चाटतात. यांमुळे त्यांना सोडियम, पोटॅशियम, लोह, फॉस्फरसयुक्त व क्षारांचा पुरवठा होऊन त्यांची हाडे व स्नायू बळकट होतात. गव्याला दोन खूर असतात व त्यांच्या विशिष्ट रचनेमुळे ते चढे डोंगर सहज चढून जातात.

गवे सामान्यतः १०-१२ जणांच्या कळपाने असतात. त्यांचा प्रजननाचा काळ ठराविक असा दिसून येत नाही. नर-मादी डिसेंबर-जानेवारीच्या सुमारास माजावर येतात. गर्भावधी नऊ महिन्यांचा असतो. प्रजननाचा काळ निरनिराळ्या प्रदेशांत पुढेमागे असतो. गव्याचे नुकतेच जन्मलेले पिलू सोनेरी पिवळ्या रंगाचे असते. नंतर ते हळूहळू तांबूस रंगाचे होऊन शेवटी लालसर तांबड्या रंगाचे अथवा कॉफीच्या रंगाचे होते. पूर्ण वाढ झाल्यानंतर गव्याच्या शरीराचा रंग काळा होतो. कपाळ राखाडी रंगाचे असते. गव्याचे पाय बळकट असून त्याचा खालचा भाग गुडघ्यापर्यंत पांढरा असल्यामुळे हा भाग पायमोजे घातल्यासारखा दिसतो. शरीरावर केस जवळजवळ नसतात. डोळे तपकिरी रंगाचे असतात. गंधज्ञान तीव्र असते. वासावरून त्यांना एकमेकांचा माग काढता येतो. श्रवणशक्ती व दृष्टी मंद असते. गव्यांची शिंगे गायी-म्हशींच्या शिंगांसारखीच असतात. शिंगे जन्मभर कायम असतात. गवे वेगवेगळ्या परिस्थितीत फिसकारणे, भ्याँऽऽ करून ओरडणे, रेकणे, हंबरणे व शिळ घालणे असे वेगवेगळे आवाज काढतात.

महाराष्ट्रातील रत्‍नागिरी, कोल्हापूर, अमरावती व भंडारा या जिल्ह्यांमधील डोंगराळ प्रदेशात ते आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये डोंगराळ प्रदेशातील गवत व पाने संपल्यावर ते खाली हिरवळ असलेल्या भागांत जातात. शेती किंवा मनुष्यवस्तीत गवा आला तर लोक, वाघ आल्यासारखे घाबरून जातात. कारण एकदा गवा बिथरला तर तो समोर दिसेल त्याला आपल्या शिंगाने उडवून लावतो. तसा गवा शांत प्राणी आहे, पण गवा बिथरण्याचे खरे कारण म्हणजे लोकांची हाराकीरी. ते गव्याला हुसकवून लावण्यासाठी खूपच गडबड गोंधळ करतात, त्यामुळे गवा बिथरतो. गवा ताकदवान असला तरी स्वभावाने बुजरा व भित्रा आहे. त्याचा एकसारखा पाठलाग केला किंवा तो जखमी झाला, तर तो चिडून हल्ला करतो. देशभरात गव्यांचा अधिवास असणारी जंगले कमी होत आहेत, परिणामी गव्यांची संख्याही लक्षणीय घटली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा