मुंबई, ४ नोव्हेंबर २०२२ : बच्चू कडू रवी राणा वाद मिटतो ना मिटतो तोच बच्चू कडू यांनी एक विधान केलंय. ते आता भाजप आणि शिंदे गटालाही धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आमची बांधिलकी शिंदे गट आणि भाजपशी आहे. पण येणाऱ्या निवडणुकीत आमची युती कुणाशीही होऊ शकते असं मोठं विधान बच्चू कडू यांनी केलंय. बच्चू कडू यांनी थेट शिंदे गट आणि भाजपला धक्का देणारं विधान केल्यामुळं राजकीय पटलावर त्याचे अनेक तर्कवितर्क निघू लागलेत. त्याचबरोबर आगामी निवडणुकांमध्ये प्रहार संघटना किती जागा लढवणार याचा अभ्यास सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं.
बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे महत्वपूर्ण राजकीय विधान करून खळबळ उडवलीय. ज्या जागांवर आमचे उमेदवार लढणार त्या जागा आताच निवडणार नाही. त्यासाठी आम्ही सहा महिने अभ्यास करतोय. किमान १० ते १५ जागांवर आम्ही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहोत. आम्ही लढणार याची भीती केवळ भाजपलाच नाही तर ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही असू शकते. असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
प्रहार संघटना कोणाशीही युती करू शकते. सत्ताधारी कुठं स्थिर राहतील? पाच वर्षाचं राजकारण पाहिलं तर सत्तेत कोणता पक्ष नव्हता असं काही सांगता येत नाही. सर्व पक्ष सत्तेत येऊन गेले. एकही पक्ष विरोधात राहिला नाही. देशात २४ पक्षांचं दिल्लीत सरकार होतं. राजकारणात एक आणि एक अधिक दोनच होतील असे नाही. ते शून्यही होतात. एक आणि एक चारही होतात. राजकारणात कुठेही शेवट पाहिला जात नाही आणि तो कोणी पाहूही नये. तो मुर्खपणा ठरतो. राजकारणाचा तळ शोधता येत नाही असेही त्यांनी सांगितले.
राजकारणात सध्या आमची बांधिलकी शिंदे गट आणि भाजप बरोबर आहे. यापुढे सर्व बाबी कशाप्रकारे समोर येतात ते पाहू. झुकते माप शिंदे गट आणि भाजपलाच राहील. यांच्यासोबत राहिलो तर यांच्यासोबत राहू ही बाबही त्यांनी स्पष्ट केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर