महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पाठवणार नोटीस

मुंबई, २२ सप्टेंबर २०२३ : नुकतीच महाराष्ट्रातील आमदार अपात्रता प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या एक-दोन दिवसांत, शिवसेना शिंदे गटप्रमुख एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठवणार आहेत. अशा स्थितीत पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गटाला आमदार अपात्रतेबाबत भूमिका मांडावी लागणार.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीबाबत निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असे निर्देश दिले होते. अशा परिस्थितीत, काल (बुधवार) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायदेतज्ज्ञ आणि विधिमंडळ सचिवालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यानंतर दोन्ही गटांच्या प्रमुखांना नोटिसा पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून आमदार अपात्रतेच्या सुनावणीला वेग आल्याचे दिसून येत असल्याने लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे.

या सगळ्या दरम्यान ठाकरे गटाने आमदार अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणीला विलंब होत असल्याची तक्रार केली होती. ठाकरे गटाने यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेवर ३ ऑक्टोबर रोजी पुन्हा सुनावणी होणार असल्याची माहितीही सर्वोच्च न्यायालयाने दिली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा