बारामतीत २५ कोटींच्या विकासकामांचे रविवारी भूमीपूजन

बारामती, २९ जानेवारी २०२१: बारामती नगर परिषद हद्दीतील रस्ते पथदिव्यांनी उजळणार आहेत. तसेच पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साठून राहण्याची समस्या कायमची मिटणार असुन शहरामध्ये १५ कोटी रुपये खर्चून पथदिवे उभारले जाणार आहेत. पावसाळी गटार योजनेसाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याकामांचे भूमीपूजन रविवारी (दि.३१) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

याबाबत नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी माहिती दिली. बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत नगरपरिषद क्षेत्रात सात व नऊ मीटर उंचीचे पथदिवे बसविले जाणार आहेत. त्यासाठी १५ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर सात मीटरचे २४८० तर ९ मीटर उंचीचे १०६० पथदिवे उभे केले जाणार आहेत.

पावसाळी गटर (स्टाॅर्म वाॅटर ड्रेनेज लाईन) कामासाठी १० कोटी रुपये खर्च असुन या कामामुळे शहरात पावसाचे पाणी रस्त्यावर साठून राहते, पावसाचे पाणी घरात येणे ही समस्या कायमची संपणार आहे. शहरातील सुमारे ३० ठिकाणी काम केले जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. रविवारी सायंकाळी ५ वाजता या दोन्ही कामांचे भूमीपूजन होणार असून नंतर नटराज नाट्य कला मंदिर येथे मुख्य कार्यक्रम होणार आहे. याप्रसंगी बारामतीकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन उपनगराध्यक्षा तरन्नूम सय्यद, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व गटनेते सचिन सातव यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा