मुंबई, २६ एप्रिल २०२१: देशात कोरोना संसर्गाची गती वाढत असताना मुंबईतून दिलासा दायक बातमी समोर आलीय. आदल्या दिवशी रविवारी मुंबईत सलग तिसरा दिवस होता, जेव्हा नवीन कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण मागील दिवसापेक्षा कमी होतं, तर बरे झालेल्या रूग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळं मुंबईतील रिकवरीचं प्रमाणही वाढलं आहे. ही बातमी दिलासा देणारी यासाठी देखील आहे कारण, देशातील सर्वाधिक प्रभावित शहरांमध्ये मुंबई आहे. संपूर्ण देशात संक्रमण वाढत चालले आहे. अशात ही आकडेवारी थोडा दिलासा देते.
रविवारी संध्याकाळी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५,५४२ नवीन रुग्ण आढळले. यावेळी ६४ रुग्णांचा मृत्यूही झाला. ८,४७८ रूग्ण बरे देखील झाले आणि घरी परतले. तर, त्यापूर्वी एक दिवस आधी शनिवारी मुंबईत ५,८८८ लोकांना कोरोनाची लागण झाली. त्या दिवशी ८,५४९ रूग्ण बरे झाले आणि ७१ जण दगावले. त्याचबरोबर शुक्रवारी (२३ एप्रिल) मुंबईत ७,२२१ नवीन रुग्ण आढळले आणि ९,५४१ रूग्ण बरे झाले. त्या दिवशी ७२ रुग्णांचा मृत्यू झाला.
या आकडेवारीनुसार शुक्रवारपासून मुंबईत रोज कोरोनाचे नवे रुग्ण कमी होत आहेत, तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्यूची संख्याही कमी होत आहे ही देखील दिलासाची बाब आहे.
मुंबईच्या बाबतीत ही आकडेवारी देखील दिलासादायक आहे की, मुंबईत शुक्रवारपासून रिकव्हरी दर सातत्यानं वाढत आहे. शुक्रवारी मुंबईचा रिकव्हरी दर% ८४% होता जो रविवारी वाढून ८६% झाला आहे. त्याच वेळी डबलिंग रेट देखील वाढला आहे. शनिवारी मुंबईतील केस डबल दर ५४ दिवसांचा होता, जो रविवारी ५८ दिवसांवर पोहोचला.
सोमवारी मुंबईत सर्व लसीकरण केंद्रे सुरू होतील
रविवारी बीएमसीने सांगितलं की, कोविशील्डचे दीड लाख डोस मिळाले असून सोमवारी शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे. ह्या महिन्यात शहरातील १२० पैकी ७५ केंद्रं लस नसल्यामुळं बंद पडली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे