भारत होत चाललाय वृद्ध… पुढच्या 15 वर्षांत 100 पैकी 77 लोक होतील वृद्ध

नवी दिल्ली, 7 जुलै 2022: तरुण कोण आहेत? संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, ज्यांचं वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असंल, ते तरुण असतील. परंतु भारतात त्यांना तरुण मानलं जातं, ज्यांचं वय 15 ते 29 वर्षे आहे. युनायटेड नेशन्सच्या मते, भारत हा जगातील सर्वात जास्त तरुण राहत असलेला देश आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सध्या देशातील 27 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या तरुणांची आहे.

तरुणांबाबत सरकारी अहवाल समोर आलाय. हा अहवाल सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MOSPI) जारी केलाय. ‘युथ इन इंडिया 2022’ असे या अहवालाचं नाव आहे. या अहवालात तरुणांची आकडेवारी देण्यात आली आहे.

या अहवालानुसार 2021 पर्यंत देशाची लोकसंख्या 136 कोटी असंल असा अंदाज आहे. यापैकी 27.3% म्हणजे 37.14 कोटी लोकसंख्या तरुण आहे. भारतही आता वृद्ध होत असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. 2036 पर्यंत देशातील केवळ 34.55 कोटी लोकसंख्या तरुण असेल. अहवालात असा अंदाज वर्तवण्यात आलाय की, पुढील 15 वर्षांत भारतातील तरुणांची लोकसंख्या कमी होण्यास सुरुवात होईल आणि वृद्धांची लोकसंख्या वाढू लागेल.

अहवालाचा अंदाज आहे की 2036 पर्यंत भारताच्या लोकसंख्येतील तरुणांचा हिस्सा 22.7% पर्यंत खाली येईल. म्हणजेच येत्या 15 वर्षांत 100 मधील 77 लोक वृद्ध होतील.

2011 मध्ये तरुण लोकसंख्येचा उच्चांक होता

2011 मध्ये देशातील तरुण लोकसंख्येचा उच्चांक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्या वेळी, देशाच्या लोकसंख्येपैकी 27.6% पेक्षा जास्त तरुण होते, परंतु तेव्हापासून तरुणांची लोकसंख्या कमी होऊ लागली आहे.

अहवालानुसार 2021 पर्यंत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तरुणांची लोकसंख्या वाढत होती, परंतु आता या दोन्ही राज्यांमध्येही घट होण्याची शक्यता आहे.

देशातील निम्म्याहून अधिक तरुण लोकसंख्या यूपी, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये राहते. त्याच वेळी, आंध्र प्रदेश, गुजरात, हिमाचल, कर्नाटक, केरळ, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये तरुणांची संख्या कमी आहे.

तरुणांची संख्या का कमी होत आहे? तीन मोठी कारणं

1. प्रजनन दर: काही वर्षांपासून प्रजनन दर कमी होत आहे. प्रजनन दर म्हणजे एक स्त्री सरासरी किती मुलांना जन्म देते. 2011 मध्ये प्रजनन दर 2.4 होता, जो 2019 पर्यंत 2.1 वर आलाय.

2. क्रूड मृत्यू दर: आता भारतात मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. क्रूड डेथ रेट म्हणजे दर हजार लोकांमागे किती मृत्यू होत आहेत. 2019 मध्ये क्रूड मृत्यू दर 6.0 होता, तर 2011 मध्ये तो 7.1 होता.

3. अर्भक मृत्यू दर: म्हणजे नवजात मृत्यू दर. हे दर्शवते की दर 1000 जन्मांमागे किती नवजात बालकांचा मृत्यू झाला. बालमृत्यूचं प्रमाणही कमी होत आहे. 2011 मध्ये प्रत्येक 1000 जन्मांमागे 44 मृत्यू होते, जे 2019 मध्ये 30 पर्यंत खाली आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा